“नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही…” फडणवीसांची जहरी टीका!

उत्तर प्रदेश, गोवा यांसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापलं आहे. उत्तर प्रदेश व गोवा राज्यातील निवडणुकांवरून महाराष्ट्रातीलही राजकारण तापलेलं दिसत आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेले शिवसेना व राष्ट्रवादी यांनी देखील या दोन्ही राज्यांमधील निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांकडूनही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस तृणमूल आणि काँग्रेसला सोबत घेऊन सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे गोव्याचे भाजपा प्रभारी व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका करत निशाणा साधला आहे. “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही” असा टोला भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.

“आम्ही कोणतीही निवडणूक हलकी समजत नाही. भाजपा गोव्यात पुन्हा सत्तेत येणार आहे. परंतु आता गोव्यात सगळ्यात मोठी अडचण ही आहे की, हे निश्चित होणं बाकी आहे की लढत कोणासोबत आहे. विरोधी पक्ष आपसातच स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.” असं देवेंद्र फडणवीसांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. गोव्यात शरद पवार भाजपला आव्हान देण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, “शरद पवारांचा पक्ष असा आहे की, ‘पानी तेरा रंग कैसा जिसमे मिलाया उसके जैसा… ’, मग ते कधी समाजवादी पार्टीशी चर्चा करतात, कधी काँग्रेसशी कधी टीएमसीशी बोलतात. त्यांचं काही राष्ट्रीय अस्तित्वही नाही, त्यांचे काही राष्ट्रीय विचारही नाही. नाव राष्ट्रवादी नक्कीच असेल परंतु ती पश्चिम महाराष्ट्राची पार्टी आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.