पदाचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांना खपवून घेणार नाही; NCB च्या कार्यपद्धतीवरुन खा. सुप्रिया सुळे यांनी संसदेत खडसावले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत नार्कोटिक ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्याविषयक विधेयकावरील चर्चेदरम्यान एनसीबी या केंद्रीय संस्थेमार्फत महाराष्ट्रात सुरु असलेल्या मनमानी कारवाईबाबत आपले विचार मांडले.
या केंद्रीय संस्थेद्वारे बॉलीवूडला बदनाम करण्याचे काम होत आहे. तसेच तरुण कलाकारांना, विशेषतः तरूण अभिनेत्रींना टार्गेट केले जात असल्याकडे खा.सुप्रिया सुळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. बॉलीवूडच्या माध्यमातून लाखो लोकांचे पोट चालते रोजगार मिळतो, जगात देशाला नावलौकीक मिळवून दिला आहे. यात अनेकांचे परिश्रम, अखंड मेहनत आहे. असे असताना एनसीबी कडून बॉलीवूडची बदनामी सुरू असून अधिकाऱ्यांकडून आपल्या पदाचा गैरवापर केला जात असल्याची टीका सुळे यांनी केली.
खा.सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य हे देशात गुटखाबंदी करणारे राज्य आहे. आम्ही जर तंबाखू, गुटख्याविरोधी लढतो आहोत तर ड्रग्स ही फार पुढची गोष्ट आहे. त्यामुळे ड्रग्स संपवण्यासाठी आम्ही आपल्यासोबत का लढणार नाही, मात्र अशा कारवाईत जे प्रशासकीय अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करतात अशांना आम्ही खपवून घेणार नाही. तसेच आपल्याला ड्रग्सविरोधात लढा द्यायचा असेल तर तरुण मुलामुलींवर कारवाई करण्यापेक्षा मोठ्या आरोपींवर कारवाईची गरज असल्याचे मत सुप्रियाताईंनी मांडले. काही अधिकाऱ्यांकडून पदाचा दुरुपयोग होतोय, यातून एखाद्यावर खोटे आरोप लावून पैसे उकळण्याचे काम होतेय, हा कोणत्या प्रकारचा न्याय आहे, अशी विचारणा खा.सुप्रिया सुळे यांनी केली.