NCB चा साक्षीदार किरण गोसावी फरारी आरोपी; मुंबईसह ३ ठिकाणी गुन्हे दाखल!

मुंबई | शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एखाद्या अधिकाऱ्याच्या तोऱ्यात ताब्यात घेऊन जाणाऱ्या किरण प्रकाश गोसावीमुळे अमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) अडचणी आणखी वाढणार आहेत. गोसावीच्या विरुद्ध मुंबईसह तीन ठिकाणी फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल असून तो पुण्यातील एका गुन्ह्यात फरारी आरोपी असल्याची बाब समोर आली आहे.

गंभीर गुन्हे आणि फरारी आरोपीला महत्त्वाच्या कारवाईत मुख्य साक्षीदार बनविण्याची चूक त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. गोसावी कार्डेलिया क्रूझवरील कारवाईवेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या बरोबरीने सहभागी असल्याचे उपलब्ध व्हिडीओ व फोटोवरून दिसून येते. आर्यन खानला दंडाला  पकडून नेताना तसेच त्याच्या समवेत सेल्फी घेणारा गोसावी हा एखादा अधिकारी असावा असा  समज झाला होता. त्यामुळे एनसीबीने सोमवारी तो खासगी व्यक्ती असून त्याचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. बुधवारी राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी त्याचा व भाजपचा पदाधिकारी मनीष भानुशाली यांचा एनसीबीच्या कारवाईतील सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर दोघांचे खरे रूप सर्वांसमोर आले. या दोघांसह १० जण साक्षीदार असल्याचे जाहीर केले. मात्र गोसावी हा सराईत गुन्हेगार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याच्यावर फसवणूक करून लाखो रुपये घेणे, धमकी देण्यासारखे ३ गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे. तर एकामध्ये तो अद्यापही फरार असल्याचे रेकॉर्डवर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.