ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं, नाना पटोले पुन्हा घसरले!
नाशिक | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. ‘आपण मोदींना शिव्या देऊ शकतो, मोदींना मारू शकतो’ असे विधान काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मागील आठवड्यात केले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून राज्यभर आंदोलने करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा पटोले यांनी नाशिक मध्ये एका कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं’, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा नवा वाद उद्भवण्याची चिन्हे आहेत. नाशिकच्या इगतपुरीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमावेळी पटोले यांनी हे विधान केले.
काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना पटोले म्हणाले की, देशातील मूळ मुद्दे बाजूला केले जात आहेत. सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. महागाईत मोठी वाढ झाली आहे. जगाच्या पाठीवर देशाची ओळख बेरोजगारांचा देश म्हणून झाली आहे. शेतकरी, व्यापारी तसेच छोट्या उद्योजकांचे प्रश्न वाढत चालले आहेत. केंद्र सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप पटोले यांनी यावेळी बोलताना केला.