मोलकरणीने चोरला ‘शार्क टँक इंडिया’ मधील शार्क नामिता थापरचा फोन अन् केली ‘ती’ पोस्ट; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल…
शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमाच्या सर्वात लोकप्रिय शार्क्सपैकी एक असलेल्या नमिता थापर सध्या काही वैयक्तिक समस्यांमुळे अडचणीत सापडली आहे. सोशल मीडियावर नमिता थापरची बदनामी करणारी पोस्ट तिच्या घरातील सुशिक्षित मोलकरणीने केल्याचं उघड झालं आहे. नमिताने स्वतः ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.
नुकतंच नमिता थापरच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती, या पोस्टमध्ये नमिताच्या मुलाने आपल्या आईची बदनामी केली होती. या पोस्टमध्ये लिहिले होते की, “मी नमिताचा मुलगा आहे. मी फक्त जगाला हे दाखवू इच्छितो की तुम्ही टीव्हीवर ज्या व्यक्तीला पाहता ती व्यक्ती खऱ्या आयुष्यात तशी नाही. तिला लवकरात लवकर अनफॉलो करा. योग्य वेळ आल्यावर मी स्वतः ह्याचा खुलासा नक्कीच करेन.” एवढंच नाही तर नमिताच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या खाली ‘वाईट आई आणि वाईट पत्नी’ असंही लिहिल्याचं आढळलं आहे.