नगरपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या जागा वाढल्या – नवाब मलिक

मुंबई | मागील पाच वर्षांपूर्वीचा नगर पंचायत निवडणुकांचा निकाल पाहीला तर भाजपमुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले असे दिसते. उलट मागील वेळेपेक्षा यावेळी शिवसेनेच्या जागा वाढलेल्या आहेत. आगामी काळात महानगरपालिका, नगरपालिकांच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या जागा वाढलेल्या दिसतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी युतीचा निर्णय घेतला होता, तरी त्यावेळी युतीतून बाहेर पडले पाहीजे, असा विचार शिवसेनेत चर्चिला गेला होता. याची माहिती मला आहे. काँग्रेससोबत राष्ट्रवादीची आघाडी असताना शिवसेनेकडून राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव आला होता. मात्र काही कारणांमुळे त्यावर पुढे काही झाले नाही. भाजपसोबत शिवसेनेचे खच्चीकरण होत आहे, अशी चर्चा २०१९ आधीपासूनच शिवसेनेमध्ये सुरु होती. भाजप ज्या पक्षांसोबत युती करते त्या पक्षांचे खच्चीकरण व त्यांना संपविण्याचे काम करते, हे शिवसेनेला आधीपासून माहीत होते. त्यामुळेच शिवसेनेने भूमिका घेऊन स्वतःला भाजपपासून बाजूला केले, असे नवाब मलिक म्हणाले.

मला वाटते की महाराष्ट्रातील ८० टक्के जनतेने भाजपला नाकारले आहे. शिवसेनेसोबत असल्यामुळेच भाजप मोठी झाली, हे आता देवेंद्र फडणवीस यांना समजते आहे. मात्र आठ वर्षांपासून जे राजकारण फडणवीस यांनी सुरु केले त्यातून केंद्राच्या आदेशावरुन शिवसेनेला संपविण्याचे काम सुरु होते. मात्र आज शिवसेनेची किंमत त्यांना कळू लागल्यामुळे फडणवीस यांच्याकडून अशी विधाने होत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.