मुंबै बँक अध्यक्ष निवडणुकीत दरेकरांना धक्का प्रसाद लाड पराभूत, राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे नवे अध्यक्ष
मुंबई | मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (मुंबै बँक) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी मिळून भाजपला जोरदार दणका दिला आहे. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे मुंबै बँकेवरील वर्चस्व संपुष्टात आले आहे. भाजपचे नेते दरेकर हे अनेक वर्षे सतत मुंबई बँकेचे अध्यक्ष होते. गुरुवारी राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे हे मुंबै बँकेचे नवे अध्यक्ष झाले. अध्यक्षपदासाठी कांबळे यांनी भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांचा पराभव केला आहे. कांबळे यांना 11 तर लाड यांना 9 मतांवर समाधान मानावे लागले. मात्र, मुंबै बँकेच्या उपाध्यक्षपदी भाजपचे विठ्ठल भोसले यांनी लॉटरीद्वारे बाजी मारली आहे. उपाध्यक्षपदासाठी भाजपचे भोसले आणि शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर यांना 10-10 मते मिळाली. यानंतर लॉटरीद्वारे भाजपचे भोसले यांना विजयी घोषित करण्यात आले. मुंबै बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पराभवानंतर भाजपचे नेते आ दरेकर म्हणाले की, आमच्या पॅनलचे एक मत कमी झाल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीला यश मिळाले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी मुंबई बँकेचे अध्यक्षपद एक वर्ष राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे सांगितले. यानंतर शिवसेनेला मुंबई बँकेचे अध्यक्षपद मिळणार आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.