खा. डॉ. अमोल कोल्हे यांचा राज्यपालांच्या पुणे दौऱ्यावर बहिष्कार

विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना निधी वाटपात जाणीवपूर्वक डावलले जात असल्याच्या निषेधार्थ भूमिका.

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन हे सध्या पुणे दौऱ्यावर असून दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.१५ वाजता राजभवन पुणे येथे जिल्हातील खासदार, विधान परिषद व विधानसभा सदस्य यांच्याशी संवाद साधणार होते. परंतु पुणे जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना व पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात जाणीवपूर्वक डावलले जात असल्याच्या निषेधार्थ राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन यांना पत्र लिहून शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. राजकीय व वैचारिक भूमिका मांडत असताना पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन विकासात्मक भूमिका, समन्वय व सुसंवाद ही आपल्या महाराष्ट्र राज्याची प्रगल्भ राजकीय संस्कृती असून विद्यमान सत्ताधाऱ्यांना याचा विसर पडला आहे, खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर मतदारसंघातील प्रस्तावित केलेल्या एकही कामाला सन २०२२-२३ व २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षांच्या पुणे जिल्हा नियोजन वार्षिक आराखडा मधून मंजुरी व निधी देण्यात आला नाही. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या अंतर्गत प्रस्तावित केलेल्या विकासकामांसंदर्भात कोणतीही कार्यवाही केली जात नाही. राजकीय हेतूर्थ विकासकामांना खीळ बसविण्याची पक्षपाती भूमिका जर घेतली जाणार असेल तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याची आणि जनतेला न्याय मिळवून द्यायची आमची तयारी आहे, अशी भूमिका खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी पत्राद्वारे मांडली. या संपूर्ण प्रकरणी राज्यपाल लक्ष घालून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना व शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला न्याय मिळवून देतील अशी आशा डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.