डॉ. प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधानपरिषदसाठी उमेदवारी जाहीर

डॉ. प्रज्ञा सातव या दिवंगत काँग्रेस नेते, माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी

दिवंगत काँग्रेस नेते, माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या एका जागेसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपकडून औरंगाबाद भाजपा अध्यक्ष संजय किणेकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत, असं देखील पाटील यावेळी म्हणाले. जुलै 2024 पर्यंत या विधानपरिषद जागेची मुदत आहे. या एका जागेची निवड आमदारांमधून होणार असल्यानं आणि महाविकास आघाडीकडे बहुमत असल्यानं काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे.

या रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, जितेंद्र देहाडे यांच्याही नावाची चर्चा सुरु होती. एकाच जागेसाठी निवडणूक होत असल्याने महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक सोपी मानली जात आहे. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर विधानपरिषदेसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी होती. 29 नोव्हेंबरला विधानपरिषदेच्या या एका जागेसाठी निवडणूक अपेक्षित आहे. 16 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.

शरद रणपिसे यांच्या रुपानं अनुसूचित जातीचं नेतृत्व काँग्रेसनं विधानपरिषदेत दिलं होतं. शरद रणपिसे यांच्या निधनानंतरची उर्वरित चार वर्षांची टर्म म्हणजे 27 जुलै 2024 पर्यंतची टर्म नव्यानं निवडून आलेल्या आमदारास मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.