उमेदवार शिक्षक परिषदेचा, प्रतिष्ठा भाजपची दावणीला …
भाजपने शिक्षक परिषदेच्या नागोराव गाणार यांना पाठिंबा दिला आहे हे येथे उल्लेखनीय.
उमेदवार शिक्षक परिषदेचा, प्रतिष्ठा भाजपची दावणीला
भाजपने शिक्षक परिषदेच्या नागोराव गाणार यांना पाठिंबा दिला आहे हे येथे उल्लेखनीय.
नागपूर: पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा (गडकरी,फडणवीस, बावनकुळे)जिल्हा असलेल्या नागपूरमध्ये प्रत्येक निवडणुकीतील जय-पराजयाचा संबध थेट नेत्यांच्या राजकीय ताकदीशी जोडला जात असल्याने विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघात भाजपचा अधिकृत उमेदवार नसला तरी शिक्षक परिषदेच्या नि्मित्ताने प्रतिष्ठा याच पक्षाची दावणीला लागणार आहे. येथे भाजपने शिक्षक परिषदेच्या नागोराव गाणार यांना पाठिंबा दिला आहे हे येथे उल्लेखनीय.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात एकूण २७ उमेदवार रिंगणात असून १६ जानेवारीला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. नागपूरमध्ये भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालय आहे, भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा गृहजिल्हा आहे. येथील कुठल्याही निवडणुकीचा थेट संबध वरील तीन नेत्यांशी जोडला जातो. निवडणुकीतील विजय हा गडकरी-फडणवीस यांचा मानला जातो आणि पराभवाचे वर्णन ‘पक्षाच्या दिग्गज नेत्यांच्या जिल्ह्यात भाजप पराभूत’असे केले जाते. उदाहरण द्यायचे झाल्यास यापूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांचेच यात देता येईल.
गतवेळी झालेल्या पदवीधर मतदारसंघातील माजी महापौर संदीप जोशी यांच्या पराभवाचे वर्णन वरील प्रमाणेच करण्यात आले होते तर त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयाचा अर्थ हा ‘गडकरी-फडणवीस यांनी बाजी मारली’ असाच काढण्यात आला होता. ऐवढेच नव्हे तर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपला एकही सभापतीपद जिंकता न आल्याने प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात सभापतीपदाची भाजपची पाटी कोरी, अशी टीका भाजपवर झाली होती. ही पार्श्वभूमी बघता शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही पक्षाचा अधिकृत उमेदवार रिंगणात नसला तरी ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरते.