डॉ.प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड जवळपास निश्चित!
कॉंग्रेसच्या शिष्ठाईनंतर भाजप उमेदवार संजय केणेकर यांची माघार
कॉंग्रेसचे दिवंगत नेते माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. कॉंग्रेसच्या शिष्ठाईनंतर भाजप उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
हि निवडणूक बिनविरोध होण्यासाठी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत हि निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर विधानपरिषदेची ही पोटनिवडणूक होत आहे.
या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली होती. खरतर राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी प्रज्ञा सांवत यांचा विचार होईल, अशी चर्चा होती.
परंतु कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी रजनी पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी प्रज्ञा सातव यांना पक्षश्रेष्ठींनी संधी दिली. भाजपच्या संजय केणेकर यांच्या माघारी नंतर विधानपरीषदेची पोटनिवडणुक आता बिनविरोध होत असल्याने प्रज्ञा सातव विधानपरीषदेच्या सदस्य होण्याची आता औपचारीकता मात्र शिल्लक राहीली आहे.