समाज एका दिशेला जात असताना माध्यमांनी मध्ये उभं राहून समाजाला दुसरी दिशा दाखवली पाहिजे – गिरीश कुबेर
“समाज एका दिशेला जात असताना माध्यमांनी मध्ये उभं राहून समाजाला दुसरी दिशाही दाखवली पाहिजे,” असं मत जेष्ठ पत्रकार व लेखक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं. ते नाशिकमधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलत होते.
गिरीश कुबेर म्हणाले, “माध्यमं हा समाजाचा एक घटक असतो, त्यामुळे माध्यमांचं मनोरंजीकरण झालं म्हणजे समाजाचं मनोरंजीकरण झालं आहे. समाजात वैचारिकतेचा अभाव असेल तर तो माध्यमांमध्येही तो तसाच दिसेल. अशा समाजाला वैचारिकतेकडे नेणं हि माध्यमांची खरी जबाबदारी असते. समाज जर एका दिशेला जात असेल तर माध्यमांनी मध्ये उभं राहून दुसरी दिशा दाखवली पाहिजे. आता उलटं झालं आहे, समाज एका दिशेने जात असेल तर माध्यमं देखील त्याच दिशेने जातात. माध्यमं पुढे पळतात की समाज पुढे पळतो अशा प्रकारचं सध्या चित्र आहे. हा माध्यमांचा खऱ्या अर्थाने पराभव आहे.”
“सध्या जे घडत आहे ते म्हणजे माध्यमांनी स्वतःची जबाबदारी टाकणं आहे. ही जबाबदारी माध्यमांनी सामूहिकपणे सोडून दिली आहे की काय असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती आहे. माध्यमं जर लोकांना चांगलं वाचायला आवडत नाही असं म्हणत असतील तर माध्यमांनी तो स्वतःच स्वतःचा केलेला मोठा पराभव आहे. याचा साधा अर्थ असा आहे की लोकांना चांगलं वाचायला देता येईल अशी क्षमता माध्यमांमध्ये नाही. ती क्षमता आम्ही गमावून बसलो आहोत. पुढील समाजाच्या प्रगतीसाठी हा मोठा धोका आहे,” असं मत गिरीश कुबेर यांनी मांडलं.
“भारताच्या किंवा जगाच्या इतिहास काढून पाहिला तर प्रत्येक महत्त्वाच्या घटनेला आकार देण्याचं आणि प्रेरणा देण्याचं काम माध्यमांनी केलं आहे. माध्यमांनी त्या काळाला आकार द्यायचा असतो. काळाला घडवणं, किमान तसा प्रयत्न करणं हा त्या माध्यमांच्या जबाबदारीचा भाग असतो. ती जबाबदारी आम्ही सोडून देतोय असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. कारण मग माध्यमांचं काम काय?” असा सवाल गिरीश कुबेर यांनी विचारला.