बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना घाटी म्हणून हिणवलं जातं; उर्मिलाने सांगितलं धक्कादायक सत्य, म्हणाली-

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज ४ फेब्रुवारी रोजी तिचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडची रंगीला गर्ल असणारी उर्मिला ४८ वर्षाची झाली असूनही सौंदर्याच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना टक्कर देते. तिचे फोटो पाहून आजही नेटकरी घायाळ होतात. उर्मिला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. १९९० दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणारी उर्मिला बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली. परंतु, तिचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. तिने त्याकाळी अनेक अडचणींचा सामना केला. मराठी असून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नाव कमावणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. तेव्हा इण्डस्ट्रीमध्ये मराठी लोकांना घाटी म्हणून संबोधलं जायचं असा खुलासा उर्मिलाने एका मुलाखतीत केला होता. आजही ती परिस्थिती फारशी बदलली नसल्याचं तिने सांगितलं.

उर्मिलाने दिलेल्या मुलाखतीत ती म्हणालेली, ‘मला तेव्हा मराठी असं म्हटलं जायचंच नाही. ते लोक मला नीट हाकही मारत नसत. ते मला घाटी म्हणून हाक मारायचे. मराठी नाही तर घाटी लोकांना नीट हिंदी बोलता येत नाही असं म्हणायचे. मराठी लोकांच्या हिंदीला घाटीपणाचा वास येतो, हे काय घाटी कपडे घातलेत असं म्हटलं जायचं. बॉलिवूडमध्ये आजही काही ठिकाणी हीच परिस्थिती आहे याकडे कानाडोळा करून चालणार नाही. मी एक मराठी अभिनेत्री असल्याचा त्रास सहन केला आहे. मला अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या, अनेकदा मनस्ताप झाला. दुसऱ्यांच्या वागण्याचा त्रास झाला. अनेकदा हिणवलं गेलं. हा बॉलिवूडचा खरा चेहरा होता. इतकंच नाही तर बॉलिवूडमध्ये तेव्हाही नेपोटीझम होतं. मी त्यावेळी काही बोलले नाही पण आता बोलते.’

उर्मिला पुढे म्हणाली, ‘१९९० च्या दशकात १५ ते १६ अभिनेत्री चित्रपटसृष्टीत आलेल्या. त्यातल्या १२ कुणा ना कुणाच्या नात्यातल्या होत्या. त्यामुळे घराणेशाही ही काही आज बॉलिवूडमध्ये आलेली नाही. ते तेव्हापासूनच सुरू आहे. प्रत्येक क्षेत्रात सुरू आहे.’ असं उर्मिला म्हणाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.