वानखेडे कुटुंबीयांवरील विधाने केल्याप्रकरणी नवाब मालिकांची उच्च न्यायालयात बिनशर्त माफी
केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांबाबत यापुढे कोणतेही विधान करणार नाही अशी हमी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली असून यापुढे कोणतीही विधाने करणार नसल्याची पुन्हा एकदा हमी दिली आहे.
मागील सुनावणीत मलिक यांनी कोणतेही वक्तव्य करणार नसल्याची लेखी हमी दिली होती. त्यानंतरही हेतुपुरस्सरपणे उल्लंघन केल्याप्रकरणी तुमच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का केली जाऊ नये अशी विचारणा करत मलिक यांना न्यायालयाने खडसावलं होतं तसेच १० डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेशही दिले होते.
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. यामध्ये अंतरिम दिलासा मिळवण्याच्या मागणीवर एकलपीठातर्फे निर्णय दिला जाईपर्यंत वानखेडे कुटुंबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी लेखी हमी मलिक यांनी दिली होती. मात्र त्यानंतरही मलिक। यांचे वानखेडे कुटुंबीयांवरील आरोपांचे सत्र सुरूच असल्याची बाब समीर वानखेडे यांचे वडिलांनी न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर निदर्शनास आणून दिली होती.
मलिक यांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले आहे असे सकृतदर्शनी स्पष्ट होते. परंतु त्यांनी न्यायालयाला दिलेल्या हमीचे उल्लंघन का केले हे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करावे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
ज्ञानदेव वानखेडे यांचे वकील अॅड. बीरेंद्र सराफ यांनी मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाच्या आदेशानंतर मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांविरोधात केलेल्या वक्तव्यांचा तपशील व प्रतिज्ञापत्रही न्यायालयात सादर करण्यात आले.
त्याची दखल घेऊन न्यायालयाने विचारणा केली, हि वक्तव्ये मलिक यांनी राजकीय पक्षाचे प्रवक्ते म्हणून केली आहेत की वैयक्तिक पातळीवर केली आहेत. त्यांनी हि वक्तव्ये वैयक्तिक पातळीवर केली असतील तर त्यांना आताच न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देऊन स्पष्टीकरण द्यायला सांगू, असेही न्यायालयाने बजावलं होतं. त्यावर मलिक यांनी ही वक्तव्ये राजकीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून केल्याचे त्यांचे वकील अॅड. तांबोळी यांनी न्यायालयाला सांगितलं होतं.