आमच्यावर पाळत ठेवली जात आहे, देशमुखांप्रमाणे मलाही अडकवलं जातंय – नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा काही लोकांना आमच्यावर पाळत ठेवायला सांगत आहेत. आमच्याविरोधात खोट्या तक्रारी करायला भाग पाडत आहेत. अनिल देशमुखांप्रमाणे आम्हालाही अडकवण्याचा प्रयत्न केला जात असून याचे पुरावे आमच्याकडे आहेत. या सर्व कट कारस्थानांबद्दल मी अमित शहांकडे तक्रार करणार असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही क्रूझ पार्टी आर्यन खान प्रकरणातील चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. तेव्हापासून माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर पाळत ठेवली जात आहे. याबाबत आमच्या हितचिंतकांनी एकाचा पाठलाग केला तेव्हा तो पळून गेला. या संशयिताची माहिती मी ट्विटरवर दिली आहे. या लोकांचं ट्विटर हँडल पाहिलं की ते भाजपशी संबंधित असल्याचं कळत आहे. अनिल देशमुख यांच्यासोबत ज्यापद्धतीने कुभांड रचण्यात आले तसंच सुरु आहे. या संदर्भात माझ्याकडे माहिती आली असून मी ती पोलिसांना देणार असल्याचं नवाब मलिक म्हणाले.