विरोधकांकडून दाऊद च्या नावाने जमीन धोपटण्याचे काम; महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

महाराष्ट्र विधानसभा नियम २९२ अन्वये विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले. कायदा व सुव्यवस्था, बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंध, सचिन वाझे आणि अँटेलिया प्रकरणामुळे पोलिसांच्या प्रतिमेला गेलेला तडा आणि सोलापूर येथे उपनिरीक्षकच वरिष्ठांतर्फे करत असलेली वसुली व त्याचे स्ट्रिंग ऑपरेशन या विषयांना विरोधी पक्षाने हात घातला होता. या विषयांसोबतच गृहखात्याशी निगडीत विषयांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले.

कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात बोलताना गृहमंत्री म्हणाले की, “मागच्या दोन वर्षात कोरोनाची परिस्थिती असताना सतत विविध राजकीय पक्षांची आंदोलने झाली. तसेच पोलिसांची आणि सरकारची प्रतिमा बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. सरकारला बदनाम करत असताना नकळत पोलिसांना आणि राज्यालाही विरोधकांकडून बदनाम केले गेले.”

नवाब मलिक यांच्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेले आहे. विरोधकांनी असे चित्र निर्माण केले की, दाऊद इब्राहिमशी संबंध असलेल्या व्यक्तीला मंत्रिमंडळात ठेवले आहे. जो माणूस पाच वेळेस विधानसभेत निवडून आला. याआधी राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना त्यावेळेला हा संबंध का दिसला नाही? तरीही आता दाऊद, दाऊद करत जमीन धोपटण्याचे काम सुरु आहे. या सगळ्या प्रकरणातून नवाब मलिक निर्दोष बाहेर येतील आणि विरोधकांचे आरोप शिल्लक राहणार नाहीत, असा विश्वास गृहमंत्री वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

सचिन वाझे आणि अँटेलिया प्रकरणात पोलिसांच्या प्रतिमेला तडा कसा गेला? अँटेलियाच्या प्रकरणात राज्याच्या एटीएसने तपास सुरु केला. पोलिसांच्या तपासाला दिशा मिळत होती. मात्र मध्येच एनआयएने हा तपास ताब्यात घेतला. आज या प्रकरणाचे पुढे काय झाले आम्हाला माहीत नाही. आज इन्कम टॅक्स, ईडी यांच्यातर्फे धाड पडली तर लगेच प्रेस नोट काढली जाते. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. मात्र आता सत्ताधारी पक्षातील लोकांना बदनाम करण्यासाठी ठरवून ही गोष्ट केली जात आहे, असा आरोप गृहमंत्र्यांनी केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर येथील पोलिसांचे वसुली प्रकरण सभागृहात मांडले. मात्र असे प्रकरण मांडण्याआधी त्यांनी थोडी माहिती घेणे गरजेचे आहे. या प्रकरणात ज्या माहिती अधिकार कार्यकर्त्याने स्टिंग ऑपरेशन केले, त्याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात पोलीस दलाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तीन आरोपींना अटक केली आहे. अवैध धंद्यांना पाठबळ दिले नाही, म्हणून अशा प्रकारे स्टिंग ऑपरेशन करुन आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्यात आली, असे गृहमंत्री म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोन फॉर्ज करुन खंडणी मागितल्याचा गुन्हा समोर आला. सध्या तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेक गुन्हे समोर येत आहेत. या गुन्ह्यातील सहा आरोपींना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. धुळ्यात डिजे लावून होळी खेळण्यात आली आणि त्यादरम्यान अज़ान सुरु झाल्यानंतर झालेल्या धुमश्चक्रीचा उल्लेख केला गेला. या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. मात्र आज राज्यातील गावागावात अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. एका बाजूला नमाज सुरु झाली की दुसऱ्या बाजूला आरती सुरु होते. आवाजाचा डेसिबल मर्यादित ठेवला जात नाही. पोलिसांची बंधने पाळली जात नाहीत. अशा पद्धतीने समाजाचे विघटन होणार असेल तर त्याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा.

प्रवीण चव्हाण यांचाही विषय विरोधकांनी काढला. चव्हाण यांना २० केसेसमध्ये सरकारी वकील म्हणून नेमले आहे. ही नेमणूक देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना केली गेली आहे. चव्हाण यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे, असे गृहमंत्री म्हणाले.

तसेच आयपीएल सामन्यांची कुणीही रेकी केलेली नाही. मुंबईत होणाऱ्या सर्व मॅचेस सुरक्षित वातावरणात पार पाडतील, अशी ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

दिशा सालियन प्रकरणात पत्रकार परिषद घेतली म्हणून केस टाकली असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. या प्रकरणातील सत्यता गृहमंत्र्यांनी सांगितली. नारायण राणे यांचा जबाब नोंदवून झाल्यानंतर त्यांना घरी जाण्यास पोलिसांनी सांगितले होते. पण त्यांनी प्रक्रिया होत नाही, तोपर्यंत घरी न जाण्याची भूमिका घेतली. पण आपण सार्वजनिक जीवनातील जबाबदार व्यक्तींनी भान पाळले पाहीजे. मनाला येईल ते बोलायचे, हे ठिक नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करणे योग्य नाही. जर चुका असतील तर नक्की दाखवा. पण सार्वजनिक जीवनात बोलताना जरा भान राखा, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.