कामगारांना ५० किलोपेक्षा जास्त वजनाचा भार वाहू देऊ नये सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश

मुंबई | विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या शरीरस्वास्थ्याला व सुरक्षिततेला धोका पोहोचू नये त्यासाठी कामगारांकडून 50 किलो वजनापेक्षा जास्त भार असलेल्या मालाची हाताळणी करू नये, असे निर्देश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत.

पणन मंत्री पाटील म्हणाले, बाजार समित्यांमध्ये 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या,  शेतमालाची माथाडी कामगारांकडून चढ-उतार करणे आरोग्यांच्या दृष्टीने घातक आहे. माथाडी कामगारांकडून 50 किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांमधून मालाची चढ-उतार होणार नाही या बाबत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे निर्देश पाटील यांनी दिले.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर राज्यातून येणारा माल असतो. त्या संबंधित राज्याला सुद्धा 50 किलोपेक्षा अधिक गोण्या भरू नये अशा सूचना द्याव्यात आणि पणन व कामगार विभागाने राज्यातील सर्व बाजार समित्यांना यासंदर्भात कळवावे. त्याचबरोबर स्थानिक जिल्हा उपनिबंधक यांनी याबाबत अधिक जन जागृती करावी, असेही सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले.

सहकार व पणन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांना 50 किलो वजनाच्यावर भार वाहू न देण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आ.शशिकांत शिंदे, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस माजी आ. नरेंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक सुनील पवार, सहायक निबंधक, अहमदनगर, शरीफ शेख, सहायक निबंधक सोलापूर श्री.माने, एपीएमसीचे संचालक अशोक वाळुंज, कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई उपसभापती धनंजय वाडकर, सचिव संदीप देशमुख, संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख, चंद्रकांत पाटील, माथाडी कामगार युनियनचे खजिनदार गुंगा पाटील, किराणा बाजार दुकाने मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, व्यापारी राजीव मणियार व कामगार तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.