भगतसिंग कोशियारी यांच्या वक्तव्याचा खा. सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसलेंकडून निषेध; सर्वच स्तरातून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध
औरंगाबाद येथील समर्थ परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालांनी वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी केली आहे. खा.उदयनराजे भोसले यांनी सोशल मीडियावर ट्विटर हँडलवरून म्हटले आहे की, राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरू होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू असल्याचे वक्तव्य करून शिवप्रेमींसह संपुर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राज्यापालांनी आपले वक्तव्य त्वरीत मागे घ्यावे, अशा शब्दात खासदार उदयनराजे यांनी राज्यपालांना सुनावले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ‘शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही.’ असे म्हंटले आहे. या वक्तव्याविषयी न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत खा.सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. या ट्विट मध्ये त्यांनी म्हंटले आहे की,
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार…
‘तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही.
औरंगाबाद येथील समर्थ परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. आपल्या देशात गुरूची परंपरा मोठी आहे. ज्याला गुरू मिळाला तो यशस्वी होतो. अगदी त्याप्रमाणेच समर्थ नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर चंद्रगुप्त असता का? असे वादग्रस्त वक्तव्य कोश्यारी यांनी केले. यावरून राज्यात नवा वाद पेटला आहे.