‘खा.अमोल कोल्हे देशाची माफी मागा, अन्यथा…’ तीन युवकांनी जाहीर केली भूमिका
राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याच्यावर आधारित ‘Why I Killed Gandhi’ या चित्रपटावरून सध्या राजकारण पेटलं आहे. राष्ट्रवादीचे खासदार आणि कलाकार अमोल कोल्हे हे नथुराम गोडसे ची भूमिका या चित्रपटात साकारणार आहे. या भूमिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असणाऱ्या अमोल कोल्हेंवर सध्या जोरदार टीका होताना दिसत आहे. या चित्रपटाला पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून जोरदार विरोध होताना दिसत आहे.
खा.अमोल कोल्हे यांनी या चित्रपटासंदर्भात व नथुरामाच्या भूमिकेवर आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे. या चित्रपटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमातून अनेक युवक युवतींनी आपले मत मांडले आहे. यामध्ये सामाजिक चळवळीशी संबंधित तीन युवकांनी अमोल कोल्हे यांनी या भूमिकेवरून जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
अमोल कोल्हे यांनी देशाची माफी मागावी अन्यथा 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी खा.कोल्हे यांच्या नारायणगाव येथील निवासस्थानाबाहेर बसून ‘महात्मा गांधी की जय’ अशा घोषणा देऊ, असं या युवकांनी म्हटलं आहे. पत्रकार आणि माध्यम तज्ञ हर्षल लोहकरे, संजय झिंजाड, शंभुसिंह चव्हाण असं या तीन तरूणांचे नाव आहे. खा.कोल्हे यांना वैचारिक स्वास्थासाठी गुलाबाची फुलं देणार असल्याचे सांगितले आहे. या सविनय गांधीवादी आंदोलनात सहभाग नोंदवण्यासाठी त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून आवाहन देखील केलं आहे.