कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीत पाटील वि. महाडिक

महाविकास आघाडीकडून सतेज पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज

महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मुंबईमधील 2, कोल्हापूर, अकोला – बुलढाणा – वाशिम, धुळे – नंदुरबार आणि नागपूर या 6 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सहा जागांपैकी कोल्हापूर विधानपरिषद निवडणूकीची सर्वाधिक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. काँग्रेसचे नेते, राज्याचे गृहराज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील यांच्या विरोधात अमल महाडिक यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अमल महाडिक यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. भाजपच्या वरिष्ठ पातळीवर यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोल्हापूरमध्ये अमल महाडिक आणि सतेज पाटील असा सामना रंगणार आहे.

या विधान परिषद निवडणुसाठी महाविकास आघाडीतर्फे सतेज पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पालकमंत्री पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार पी. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.