शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांना विरोध करणाऱ्या प्रवृत्ती याच; मी खचलो नाही – अभिनेते किरण माने
मुंबई | स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून राजकीय भूमिका मांडल्याने त्यांना मालिकेमधून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणावरून सोशल मीडियावर सध्या जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. सोशल मीडियावर किरण माने यांना अनेकांचा पाठींबा मिळत आहे. याबाबत स्वतः किरण माने यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
“माझ्याबाबत सांगितलं जात आहे की तुम्ही फक्त केंद्र सरकारच्या विरोधात बोलत आहात. पण मी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत कर्मचाऱ्यांच्या बाजूनेही पोस्ट लिहिल्या आहेत. या पोस्ट राज्य सरकारच्या विरोधात आहे. कोणतंही सरकार आलं तरी त्यांच्या चुकीच्या विरोधात मी पोस्ट करणारच. तो माझा अधिकार आहे. अशी भूमिका किरण माने यांनी मांडली आहे. तसेच याआधीही अनेक कलाकारांनी अशा भूमिका मांडलेल्या आहेत. मात्र आपण जर या पुढील काळात बोललं नाही तर ही वृत्ती अशीच फोफावत जाणार” असा संतापही माने यांनी व्यक्त केला आहे. आज काँग्रेसची सत्ता असती तरी मी त्यांना जाब विचारला असता. हे सजग नागरिकाचे कर्तव्य आहे. राजकारणावर बोलू नको, लिहू नको हे बोलणे योग्य नाही. आम्ही कॉलेजमध्ये असताना राजीव गांधी यांच्यावर टीका करणाऱ्या एकांकीका केल्या आहेत. मला विरोध करणारे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला, तुकाराम महाराजांना विरोध करणारे याच प्रवृत्तीचे लोक आहेत असा आरोप माने यांनी केला आहे.
माझ्या राजकिय लिखाणातील तिरकस शैलीमुळे काही लोकांना मी जाणीवपूर्वक त्यांच्याबाबत लिहित असल्याचा समज आहे. “आमच्या नाटकाला एक किंवा दोन प्रेक्षक असले तरी हाऊसफुल्ल असल्यासारखं जीव ओतून आम्ही काम करतो”, असं मी म्हटलं होतं. त्यात काही मी चुकीचं लिहिलं असं वाटत नाही, असंही ते म्हणाले. तसेच मी एखाद्या नेत्याबाबत चांगली पोस्ट लिहिली म्हणजे मी त्या पक्षाचा झालो असं होत नाही. मी आजवर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, विद्रोही तुकारामाचे विचार मी मांडत आलो आहे आणि ते मी आजच्या काळाशी जोडतो आहे. त्यामुळे बहुजनांचेच नाहीतर सामान्य लोकांचे जगणे या पुढील काळात अवघड होणार आहे. माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत आवाज उठवला नाही तर पुढील काळात सामान्य व्यक्तीच्या सर्व गोष्टींवर बंधन येतील. माझ्या पोस्टमुळे मला ट्रोल केले जात आहे. अश्लील भाषा वापरली जात आहे. पण मी खचलो नाहीये. ही विषारी भाषा दिवसेंदिवस वाढत चालली आहे याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे असल्याचेही किरण माने यांनी म्हटले आहे.