जिंकले हिंगे पण चर्चा गिरेंना झालेल्या मतदानाची…

गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीची मते फुटली

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आंबेगाव तालुक्यातील ‘अ’ वर्ग संचालकपदासाठी झालेल्या निवडणुकीत संघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे हे विजयी झाले. त्यांना ३५ मते मिळाली. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरुण गिरे हे दोन्ही मतदारसंघातून पराभूत झाले असले तरी त्यांना अ वर्गात १२ मते, तर इतर मागास प्रवर्गातून तब्बल २२ मते मिळाली आहेत. गिरे यांना मिळालेली मते पाहता दक्षता आणि सगळी खबरदारी घेऊन सुध्दा खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातच राष्ट्रवादीची मते फुटल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन होऊन सुध्दा राष्ट्रवादीची मते फुटल्याची तालुक्यांत दबक्या आवाजात चर्चा आहे.

आंबेगाव तालुका सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गृहमंत्री वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथे सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा आहे. विष्णू हिंगे गेली ३२ वर्ष दूध संघावर संचालक आहेत. संघाच्या अध्यक्षपदी काम करण्याची त्यांना संधी मिळाली आहे. हिंगे यांनी या निवडणुकीची जय्यत तयारी केली होती. मतदारांमध्ये बहुसंख्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. हिंगे यांचा विजय निश्चित मानला जात होता. तालुक्यातील ४७ पैकी ४० ते ४२ मते हिंगे यांना मिळतील, असा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अंदाज होता. पण हिंगे यांना ३५, तर गिरे यांना १२ मते मिळाली. इथेही राष्ट्रवादीची मत फुटल्याच दिसतय, इतर मागासवर्ग मतदार संघातही आंबेगाव तालुक्यातून शिवसेनेचे अरुण गिरे यांना तब्बल २२, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भाऊ देवाडे यांना २४ मते मिळाली आहेत.

 

मला झालेले मतदान प्रस्थापितांच्या विरोधात : गिरे

शिवसेना पक्ष व माझ्या व्यक्तिगत संबंधामुळे मला अपेक्षित मतदान मिळाले आहे. जिल्ह्यातून व आंबेगाव तालुक्यातून दोन ठिकाणी उभा होतो. मतदारांनी प्रस्थापितांच्या विरोधात मला मतदान केले आहे. मतदारांचा मी आभारी आहे, असे शिवसेनेचे आंबेगाव तालुकाप्रमुख तथा पराभूत उमेदवार अरुण गिरे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.