पोटनिवडणूक जाहीर | कसबा पेठ व चिंचवडची जागा भाजपा राखणार का?

पुणे शहरातील कसबा पेठ मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात असे भाजपचे प्रयत्न सुरू असले तरी विरोधकांनी मात्र अद्याप याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. मुख्यत्वे कसबापेठ मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस आणि चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमुळे या दोन्ही मतदार संघात शिवसेना(उद्धव ठाकरे) यांची भूमिका महत्वाची ठरेल.

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुका घेण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केले. 31 जानेवारीपासून 7 फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. पोटनिवडणुकीसाठी मतदान 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 2 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

कसबा मतदारसंघात दिवंगत आमदार टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, या मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त आहे. खासदार गिरीश बापट यांच्या स्नूषा स्वरदा बापट, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर आणि धीरज घाटे हे प्रबळ दावेदार आहेत. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत स्वरदा बापट वगळता तिघे उमेदवारीसाठी इच्छुक होते. याबाबत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, ‘पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारीबाबत अद्याप पक्षामध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही’. चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जगताप यांच्या पत्नी अश्विनी किंवा बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली गेल्यास या मतदारसंघात निवडणूक बिनविरोध होण्याचा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.