Kasba Bypoll: कसबा पोटनिवडणुकीत भाजपने टिळक घराण्याला डावलले, शैलेश टिळक स्पष्टच म्हणाले…
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये चिंचवड मतदारसंघातून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, कसबा पेठ मतदारसंघात भाजपने टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून मुक्ता टिळक यांच्या परिवारातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज होता. परंतु, भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. या घोषणेनंतर अवघ्या काही तासांमध्येच नाराजीचे स्वर उमटू लागले आहेत. कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. ते शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी शैलेश टिळक यांनी आपल्या परिवारातील कोणत्याही व्यक्तीला उमेदवार न मिळाल्याची खंत स्पष्टपणे बोलून दाखवली. एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर ज्या सदस्याचे निधन झाले आहे, त्याच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. त्याप्रमाणे आमच्या घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी मिळावी, अशी मागणी आम्ही केली होती. विधानसभेचा कालावधी संपण्यासाठी आता वर्ष ते सव्वा वर्षाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे मुक्ता टिळक यांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आमच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी मिळावी, अशी आमची मागणी होती. पक्ष पक्षाने वेगळा निर्णय घेतला, पण तो आम्हाला मान्य आहे, असे शैलेश टिळक यांनी म्हटले.
भाजपने टिळक घराण्याबाहेर व्यक्तीला उमेदवारी दिल्याबाबत तुमच्या मनात नाराजी आहे का, असा प्रश्न शैलेश टिळक यांना विचारण्यात आला. त्यावर टिळक म्हणाले की, पक्षाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. पण खंत एवढीच आहे की, मुक्ता टिळक यांनी आजारपणातही पक्षासाठी काम केले होते. त्यामुळे भाजपच्या निर्णयाने त्यांच्यावर अन्याय झाला, अशी खंत वाटते. हे बोलताना शैलेश टिळक यांचे डोळे पाणावले होते, त्यांचा कंठही दाटून आला होता. त्यामुळे टिळक घराण्याबाहेर देण्यात आलेली उमेदवारी त्यांना फारशी रुचली नसल्याची चर्चा आहे.
टिळक घराण्यातील व्यक्तीलाच उमेदवारी मिळायला पाहिजे होती. पण भाजपने काय आणि कसा विचार केला हे माहिती नाही. पण आता पक्षाने दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. त्यामुळे आम्ही कोणताही वेगळा विचार करणार नाही, आम्ही भाजपसोबतच राहू. काल रात्री देवेंद्र फडणवीस आम्हाला भेटायला घरी आले होते, तेव्हा म्हणाले की, अजून काही निर्णय झालेला नाही, दिल्लीतून घोषणा झाल्यावर कळेल. मुक्ता ताई या गेल्या २० वर्षांपासून भाजपसोबत काम करत होत्या. त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम केले होते. त्यांचे एक धोरण होतं, की, पक्ष जो आदेश देईल ते धोरण मानून पुढे जायचे. आमचं पण तेच धोरण आहे. त्यामुळे पक्षाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे, असे शैलेश टिळक यांनी सांगितले. परंतु, टिळक घराण्याच्या नाराजीमुळे कसब्यातील भाजपचा पारंपरिक मतदार नाराज होणार का? याचा फटका हेमंत रासने यांना बसणार का, हे आगामी काळात पाहावे लागेल.