कर्जत नगरपंचायत निवडणूक | भाजपच्या उमेदवारांची शेवटच्या क्षणी माघार! राम शिंदे संतापले

अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यातील रोहित पवार आमदार असलेल्या कर्जत जामखेड मधील कर्जत नगरपंचायतीचाही निवडणूक कार्यक्रम सध्या सुरू आहे. या निवडणूकीचा आज उमेवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता.

कर्जत नगर पंचायतीच्या १७ जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली. मात्र ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने १३ जागांवरच निवडणूक होत आहे. त्यामध्ये भाजपच्या महत्त्वाच्या उमेदवारांनी अचानक माघार घेतली. त्या जागांवरील निवडणूक बिनविरोध होऊन राष्ट्रवादीच्या जागा वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संतापलेल्या शिंदे यांनी प्रथम या उमेदवारांना चांगलेच फैलावर घेतले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसोबत त्यांची खडाजंगी झाली. शेवटी शिंदे यांनी ग्रामदैवत गोदड महाराज यांच्या मंदिरासमोर ठिय्या देत मौन आंदोलन सुरू केले.

ही निवडणूक आमदार रोहित पवार व राम शिंदे यांनी प्रतिष्ठेची केली आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीच राम शिंदे यांचे समर्थक असलेले प्रसाद ढोकरीकर व नामदेव राऊत यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राम शिंदे यांनी युवा कार्यकर्त्यांना संधी देत सर्व जागांवर उमेदवार दिले. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या चार ते पाच उमेदवारांनी उमेवारी अर्ज मागे घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसने दबाव तंत्राचा वापर करून अर्ज मागे घ्यायला लावले, असा आरोप राम शिंदे यांनी केला. याबाबत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. यासंबंधी राम शिंदे यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “कर्जत नगरपंचायत निवडणुकीत आमदारांच्या दबाव व दडपशाहीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवारी अर्ज काढले. त्यामुळे संत शिरोमणी गोदड महाराज मंदिरासमोर न्याय हक्कासाठी मौन ठिय्या आंदोलन करीत आहे.”

 

Leave A Reply

Your email address will not be published.