‘भीक मागून पुरस्कार मिळतात, स्वातंत्र्य नाही’; कन्हैया कुमारांचा कंगनाला टोला

‘भीक मागून पुरस्कार मिळतात, स्वातंत्र्य नाही’; कन्हैया कुमारांचा कंगनाला टोला

पुणे |  “स्वातंत्र्य भीक म्हणून कधीच मिळत नाही. स्वातंत्र्य बलिदानानंतर मिळतं, त्यागानंतर मिळतं, संघर्ष केल्यानंतर मिळतं. लोकांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा त्याग करुन स्वातंत्र्य मिळवलं आहे. भीक म्हणून पुरस्कार मिळू शकतो, स्वातंत्र्य नाही मिळत” असं म्हणत काँग्रेस युवा नेता कन्हैया कुमार यांनी वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौतला टोला लगावला आहे. देशातील बदलती राजकीय व सामाजिक परिस्थिती यावर पुण्यात वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना कंगनाच्या वक्तव्यावर प्रश्न विचारण्यात आला होता.

 “स्वातंत्र्य भीक म्हणून कधीच मिळत नाही. स्वातंत्र्य बलिदानानंतर मिळतं, त्यागानंतर मिळतं, संघर्ष केल्यानंतर मिळतं. लोकांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा त्याग करुन स्वातंत्र्य मिळवलं आहे. भीक म्हणून पुरस्कार मिळू शकतो, स्वातंत्र्य नाही मिळत”

– काँग्रेस युवा नेता कन्हैया कुमार

यावेळी कन्हैया कुमार म्हणाले, काँग्रेस पक्ष उघडलेल्या पुस्तकासारखा आहे. ज्यांना वाचता येते ते वाचतात आणि ज्यांना नाही येत ते त्याची पाने फाडतात. काँग्रेसचे चरित्र हे या देशाचे चरित्र आहे. एकाच बागेत अनेक रंगाची फुले फुलवण्याचा विचार म्हणजे काँग्रेस. या देशात कट्टरतावाद चालत नाही. ज्यांना देश वाचवायचा आहे त्यांनी काँग्रेसमध्ये या. नेतृत्व तोच पक्ष करेल ज्याला देश समजेल.

ज्यांनी रेल्वे नाही बनवली, ज्यांनी बीएसएनएल उभी नाही केली ते एका सेकंदात या कंपन्या विकणारच. ज्यांनी या कंपन्या उभ्या केल्या तेच या कंपन्या वाचवणार. एक बडबोला माणूस अर्ध्या रात्री ऊठून काहीही बोलेल तर देश वाचणार नाही. हा माणूस देश विकणारच. गांधींना मानणाऱ्यांनी काँग्रेसमध्ये या, त्यांची हत्या करणाऱ्यांना मानणाऱ्यांनी भाजपात जा असं आवाहन काँग्रेस युवा नेते कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांनी पुण्यात बोलताना केले.

सध्या संसदेत एकाही विषयावर चर्चा होत नाही. मोदींना पर्याय काय विचारता? ही लोकशाही आहे, इथे कोणावाचून काहीच राहत नाही. देशात पंतप्रधानांना विरोध केला तर देशद्रोही कसं ठरवलं जातं? असा प्रश्नही कन्हैया कुमार यांनी यावेळी उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.