नवी दिल्ली | रायपूर येथील धर्मसंसदेदरम्यान महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण यांना आज अटक करण्यात आली आहे. कालीचरण यांना खजुराहो येथील बागेश्वरी धामजवळ अटक करण्यात आली.
रायपूरचे एसपी प्रशांत अग्रवाल यांनी माध्यमांना सांगितले की ‘धर्म संसद’मध्ये महात्मा गांधींचा अपमान करणाऱ्या कथित प्रक्षोभक भाषणासाठी हिंदू द्रष्ट्याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध रायपूरच्या टिकरापारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे .
“कालीचरण हे मध्य प्रदेशातील खजुराहोपासून 25 किमी अंतरावर असलेल्या बागेश्वर धामजवळ भाड्याच्या घरात राहत होते. रायपूर पोलिसांनी आज पहाटे 4 वाजता त्यांना अटक केली. संध्याकाळी उशिरापर्यंत पोलिसांचे पथक आरोपीसह रायपूरला पोहोचेल,” असे प्रशांत, एसपी रायपूर यांनी सांगितले.
एका पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, रविवारी रात्री टिकरापारा पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहिता कलम 505 (2) (वर्गांमध्ये शत्रुत्व, द्वेष किंवा दुर्भावना निर्माण करणे किंवा प्रोत्साहन देणे) आणि 294 (अश्लील कृत्ये) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
कालीचरण महाराज यांनी रायपूर धर्म संसदेत महात्मा गांधींबद्दल अपशब्द बोलले होते. त्या घटनेनंतर, 27 डिसेंबर रोजी कालीचरणने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर 8 मिनिटे 51 सेकंदांचा व्हिडिओ जारी केला. व्हिडीओमध्ये कालीचरण यांनी म्हटले होते की, गांधींना शिवीगाळ केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही.