माळशेज घाटातील काळू धबधबा ट्रेक ! एक अविस्मरणीय निसर्ग अनुभव

नवीन वर्ष येतं जातं ,पुन्हा नवीन वर्ष येतं नि जातं. आयुष्यामध्ये वर्षा मागून वर्षे सरत असतात .’नवीन वर्ष नवा संकल्प ‘हे तर अगदी ठरलेलं असतं! नवीन वर्षाची सुरुवात देखील बऱ्याच जणांना आठवणीत राहील अशी करायची असते. आम्ही देखील नवीन वर्षाची सुरुवात निसर्गाच्या सानिध्यात नाईट कॅम्पिंग करून करायचे ठरवले. ठिकाण ठरले माळशेज घाटातील काळू धबधबा ! शिवनेरी ट्रेकर्सचे अध्यक्ष श्री.निलेश खोकराळे व त्यांचे सहकारी श्री.अनिल काशीद यांच्यासोबत बारा जणांचा ग्रुप तयार झाला. काळू धबधबा माळशेज घाटातील सर्वात मोठा धबधबा आहे व महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधब्यांपैकी एक आहे. ३० जानेवारीला दुपारी आमची १४ जणांची टीम दोन वाजता नारायणगाव आळेफाटा मार्गे माळशेज घाट व नंतर थितबी गावच्या हद्दीतून निसर्ग पर्यटन केंद्र शेजारील रस्त्याने सहा वाजता धबधब्याजवळ पोहोचलो. उंच उंच डोंगर व गर्द झाडी, करवंदाची कधी न पाहिलेली उंचच उंच झाडे व त्यांना आलेली सुंदर फुले लक्ष वेधून घेत होती.

वातावरणात निरव शांतता होती. सर्वांनी जबाबदारी विभागली काहींनी तंबू लावले, काहींनी चूल बनवली, तर काहींनी सूप व मसाले भाताची तयारी केली! थंडी जास्त नव्हती पण वारा जाणवत होता! गरमागरम चुलीवरचे सूप आम्ही चुलीभोवती गोल करून प्यालो व मसालेभात होईपर्यंत सर्वांनी छान गप्पा गोष्टी केल्या .सहजच मनात विचार डोकावून गेला की गर्दीत लोकांमध्ये राहणारे आपण सध्यातरी घरी यायला उशीर झाला म्हणून बिबट्याला घाबरत असतो तर रात्री चोरांना घाबरत असतो आणि इथे या उलट होते जंगल, बाजूने उंच डोंगर चंद्राचा शितल प्रकाश फक्त आमचाच ग्रुप तरी देखील आम्हाला या निसर्गाच्या सानिध्यात कुणाची भीती वाटत नव्हती हे केवळ निसर्गाच्या अद्भुत शक्तीमुळे!

मला वाटते ‘निसर्ग’ म्हणजे निस्वार्थपणे सर्वांवर प्रेम करणारी शक्ती ! तिच्या सानिध्यात गेल्यावर तुम्ही देखील सर्व चिंता ,राग, द्वेष विसरून जाता व एका वेगळ्याच दुनियेत रमता.

चुलीवरचा गरमागरम मसालेभात खाल्ल्यानंतर गप्पा गोष्टी करताना सर्वांचे ट्रेकिंगचे अनुभव ऐकले व आम्ही आपापल्या तंबूत जाऊन निजलो. सकाळी लवकर उठून कोरा चहा व मॅगीचा नाश्ता करून आम्ही धबधब्याकडे निघालो .जसे जसे वर वर धबधब्या कडे जात होतो तसतसे काळु नदीच्या प्रवाहाचा अंदाज येत होता. मोठं मोठे दगड पार करत आम्ही वर धबधब्याजवळ पोहचलो ३७० मीटर उंचीवर असणारा हा धबधबा पावसाळ्यात पाहायला जाणं खूप जीवघेणं ठरू शकतं. सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये नक्कीच आपण भेट देऊ शकता व रिव्हर्स वॉटर फॉल तसेच इंद्रधनुष्याचा आनंद घेऊ शकता. धबधब्याकडे जाताना लोखंडी किंवा रायखुरा या नावाने ओळखली जाणारी सुंदर फुले लक्ष वेधून घेत होती. अनेक ठिकाणी पाण्याचे नैसर्गिक स्विमिंग पुल पाहायला मिळत होते. त्यातीलच एका डोहामध्ये वर्षभर पाणी असते व ते पिण्यायोग्य असते अशी माहिती मिळाली. गेल्यावर्षी पावसाळ्यात पर्यटक वाहून गेल्यामुळे काळू धबधब्यापाशी रेस्क्यू करण्यात आले होते. पाऊस वाढला की धबधब्याचे पाणी अचानक वाढते व पर्यटकांना याचा अंदाज येत नाही धबधब्याच्या बाजूला वरून दरड देखील कोसळते शाकाहारी प्राण्यांची विष्ठा पाहून त्यांचा तेथील वावर जाणवत होता. पाण्याच्या प्रवाहामुळे बरेच मोठे दगड गुळगुळीत झालेले दिसत होते. चढताना अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती ती म्हणजे जागोजागी प्लास्टिकच्या बॉटल्स व प्लास्टिक कॅरीबॅगचा कचरा पर्यटकांनी तसाच सोडला होता. या लेखाच्या माध्यमातून मी सर्वच पर्यटकांना आव्हान करते की ज्येष्ठ पर्यटक आनंद पाळंदे सर असं म्हणतात की आपण पर्यटनासाठी जेव्हा जातो तेव्हा तेथून सोबत आवडले तरी काही वस्तू घेऊन येऊ नये व तेथे पाऊलखुणा सोडल्या तर काही सोडू नये. आपल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जबाबदारी आपण स्वतः घ्यावी हे महत्त्वाचे!

यावर्षी उशिरा पर्यंत पाऊस झाल्यामुळे धबधबा अजून देखील चालू होता व आम्हांलाही मनसोक्त भिजण्याचा आनंद घेता आला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळू धबधब्याचे हे विशाल दगड रूप पावसाळ्यात पाहायला मिळाले नसते. कितीही वेळा या सह्याद्रीच्या कुशीत जावे व त्याचे कौतुक करावं तेवढं कमीच! तेथून पाय निघता निघत नव्हते पण सर्वांच्या वेळेचा विचार करून आम्ही धबधब्यापासून खाली उतरलो व सरत्या वर्षाला निरोप देऊन घरी पोहोचलो! अशा रीतीने एका निसर्ग सहलीचा हा अनुभव घेत पुढील वर्षाच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज झालो.

Leave A Reply

Your email address will not be published.