जुन्नर बिबट सफारीसाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार; आमदार अतुल बेनके यांच्या मागणीला शासनाकडून प्रतिसाद
सध्या जुन्नर तालुक्यात बिबट सफारी प्रकल्पासंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहेत. जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी प्रकल्पा संबंधी आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, वन विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक पार पडली. या बैठकीसंदर्भात वन विभागाने प्रेसनोट जाहीर केली आहे. बिबट सफारी प्रकल्पाबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आजपर्यंत जुन्नर बिबट सफारी संदर्भात परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर केला गेलेला नसून जुन्नर बिबट सफारी बाबतचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) पुणे श्री. एन आर प्रविण यांनी सांगितले
एन. आर. प्रविण यांनी सांगितले की जुन्नर बिबट सफारी संदर्भात अनेक संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये येत आहे परंतु जुन्नर बिबट सफारीबाबत कुठलाही परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झालेला नाही. त्याअनुषंगाने आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आज पुन्हा एकदा जुन्नर मध्येच बिबट सफारी होण्यासाठी आग्रही मागणी केली त्याअनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी जुन्नर वन क्षेत्रात परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर जुनच्या पुरवणी मागण्यांमध्ये निधी उपलब्ध करून देण्याचे आमदार अतुल बेनके यांना आश्वासित केले आहे.
प्रत्येक जुन्नरकराच्या मनातील व हृदयातील तळमळ यामुळेच हि बिबट सफारी झाली आहे. यानिमित्ताने जुन्नर तालुक्याच्या पर्यटन विकासात एक शाश्वत आणि ठोस पाऊल पडत आहे. तिथीनुसार शिवजयंती व जागतिक वन दिनाच्या निमित्ताने शासनाने हा निर्णय घेतला याबद्दल शासनाचे मनःपूर्वक आभार अशी प्रतिक्रिया आमदार अतुल बेनके यांनी दिली आहे.