जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांचे वर्चस्व, सहकार पॅनेलने मारली बाजी
जळगाव | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत सुरुवातीला भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी पॅनेलच्या वाटाघाटीची चर्चा खडसेंनी केली होती.
या राजकीय डावपेचात एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांना धोबीपछाड देत जिल्हा बँकेचे मैदान मारलेच. यानिमित्ताने जळगावच्या सहकारावर त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले.
राज्यभर चर्चेत असणाऱ्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलचे डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, अॅड. रोहिणी खडसे हे उमेदवार विजयी झाले आहेत.
आज सकाळी मतमोजणीमध्ये सहकारी पॅनेलला यश मिळाले आहे. राखिव गटातील सहा मतदारसंघात देखील सहकार पॅनलने बाजी मारली आहे. यामध्ये इतर संस्थांच्या मतदारसंघात सहकार पॅनलचे माजी मंत्री गुलाबराव देवकर १५०१ मते मिळवून विजयी झाले. इतर मागासवर्ग मतदारसंघात सहकार पॅनलचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील २३१६ मते मिळवून विजयी झाले. अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून सहकार पॅनलचे श्यामकांत सोनवणे २४६४ मते मिळवून विजयी झाले. व्ही. जे. एन. टी. मतदारसंघात सहकार पॅनलचे मेहताब सिंग नाईक विजयी झाले. महिला राखीव मतदारसंघात सहकार पॅनलचे उमदेवार विद्यमान चेअरमन अॅड. रोहिणी खडसे व शैलजा निकम या विजयी झाल्या . खडसे यांना २२३५ मते मिळाली, तर निकम यांना १९२५ मते मिळाली आहेत.