महानगरपालिका निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन लढण्याची राष्ट्रवादी ची भूमिका – जयंत पाटील
महानगरपालिका निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन लढण्याची राष्ट्रवादी ची भूमिका – जयंत पाटील
पुणे | “महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस सोबत आघाडी करण्याबाबत आमचे स्थानिक पातळीवरचे नेते निर्णय घेतील व या निर्णयास आमचा पाठिंबा असेल. लोकसभेची जागा मिळवण्यासाठी निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या नगरसेवकांना अडचणीत आणण्याची कृती कोणताही शहाणा पक्ष करणार नाही. त्यामुळे आघाडी करून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी सर्व पक्ष प्रयत्नशील असणार आहेत,’’असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्पष्ट केले.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आ. चेतन तुपे, आ. सुनील टिंगरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ आदी उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त नगरसेवक निवडून आल्यास पुणे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी दावा करेल यामुळे काँग्रेसचा आघाडीत येण्यास विरोध आहे का ? असा प्रश्न विचारण्यात आला यावर जयंत पाटील यांनी उत्तर दिले की “एका खासदारासाठी निवडून येणाऱ्या नगरसेवकांना कोणताही पक्ष संकटात टाकणार नाही”.
महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र यावेत ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी इतर पक्षांच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतील, व त्यास आमची सहमती असेल, असे पाटील यांनी सांगितले.
राज्य पातळीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाची भाषा करत आहेत, त्यांची समजूत काढणार का या प्रश्नावर पाटील म्हणाले, समजूत काढण्याचा प्रश्न येत नाही, वारंवार स्वबळाची भाषा ते करत असतील तर ते त्यांचे धोरण आहे. परंतु स्थानिक कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास ते भूमिका बदलू शकतील.’’
भाजपविरोधातील सर्व पक्षांना आहेत त्यांना एकत्र घेतले पाहिजे हि आमची भूमिका आहे. सध्या युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी या आहेत. देशात महागाई, शेतकरी आंदोलन असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत.
शिवसेना आमच्यापासून तोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस सावरकरांचा मुद्दा उपस्थित करत आहेत. राजकारणासाठी साहित्य संमेलनाचा वापर करणे योग्य नाही, अशी टीका पाटील यांनी फडणवीस यांच्यावर केली.