ईडी कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय? देवेंद्र फडणवीसांच्या तक्रार अर्जाचा उल्लेख करत आ. मिटकरींचा सवाल
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक विकासमंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) काल अटक केली. या प्रकरणावरून राज्यातील नव्हे तर देशातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडी आणि भाजप पक्ष नेत्यांमध्ये यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर निशाणा साधला आहे. फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासंदर्भातील एक तक्रार राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी समोर आणली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हि तक्रार दाखल असूनही फडणवीस यांच्यावर ईडीने कोणतीही कारवाई केली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आमदार अमोल मिटकरी यांनी या तक्रार अर्जाचा फोटो ट्विट केला आहे. या संदर्भात त्यांनी म्हटले आहे की, 4 सप्टेंबर 2019 म्हणजे 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोहनीश जबलपुरे यांनी ॲक्सिस बँक नुकसानीचा सप्रमाण लेखाजोखा ईडीकडे सादर केला, त्याचा हा पुरावा. या तीन वर्षात दोघांपैकी एकालाही ईडीने चौकशीसाठी बोलावले नाही. ईडी कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय? असा प्रश्न आमदार मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील सत्ताधारी नेत्यांना ईडी कडून चौकशीसाठी ताब्यात घेतले जात असताना भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जातोय असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे.
4 सप्टेबर 2019 म्हणजे 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोहनिश जबलपुरे यांनी ॲक्सिस बँक नुकसानीचा सप्रमाण लेखाजोखा ED कडे सादर केला त्याचा हा पुरावा. या तीन वर्षात दोघांपैकी एकालाही ED ने बोलावले नाही. ED कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय? pic.twitter.com/7DJ1RiajEV
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 23, 2022