IND vs NZ: “…तर आपण जगावरही राज्य करू शकतो”, मोहम्मद शमीचा उमरान मलिकला मोलाचा सल्ला

रायपूर : सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 21 जानेवारी रोजी रायपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून भारतीय संघाने नववर्षात सलग दुसऱ्या वन डे मालिकेवर कब्जा केला. न्यूझीलंडने दिलेल्या 109 धावांच्या आव्हानाचा पाठलाग टीम इंडियाने सहज केला आणि मालिका आपल्या नावावर केली.
मोहम्मद शमीचा उमरान मलिकला मोलाचा सल्ला
दरम्यान, दुसऱ्या सामन्यात मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 बळी घेतले. अनुभवी शमीने जम्मू एक्सप्रेस उमरान मलिकला गोलंदाजीबाबत काही सल्ले दिले आहेत. ज्याचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे. उमरान मलिकने शमी सतत आनंदात का असतो असा प्रश्न विचारला असता शमीने म्हटले, “आपण जेव्हा देशासाठी खेळतो तेव्हा मला वाटते की स्वत:वर दबाव घेऊ नये. दबाव घेतल्याने त्याचा खेळावर परिणाम होतो. मी तुला शभेच्छा देतो, तुझ्याकडे जी गती आहे त्याला खेळणे खूप कठीण आहे, तुझी गोलंदाजी खूप चांगली आहे. मात्र, आपल्याला फक्त लाइन आणि लेंथवर काम करायचे आहे. ते जर व्यवस्थित असेल तर आपण जगावर राज्य करू शकतो.”
रोहित शर्मा अँड कंपनीने न्यूझीलंडचा दुसऱ्या वन डे सामन्यात आठ गडी राखून पराभव करून किवीविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. या सामन्यात मोहम्मद शमीने तीन, हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. तर शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ 34.3 षटकात 108 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने लक्ष्याचा पाठलाग आठ गडी आणि 29.5 षटके राखून केला.

Leave A Reply

Your email address will not be published.