बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना अटक; पोलिसांची पुणे-नाशिक महामार्गावर कारवाई

बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली. शिरगाव परंदवडी पोलीस आणि गुंडा विरोधी पथकाने या कारवाया केल्या. आरोपींकडून दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे, एक चारचाकी वाहन जप्त केले.

सोमाटणे-कासारसाई रस्त्यावर साळूंब्रे गावात एकजण पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती शुक्रवारी (दि. २७) दुपारी शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका हॉटेल समोर सापळा लावून सागर चंद्रकांत नखाते (वय ३२, रा. सतेज चौक, औंधगाव) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार ४०० रुपयांचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. पोलिसांनी पिस्तूल आणि काडतुसे जप्त करत नखाते याला अटक केली.

गुंडा विरोधी पथकाने पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे शुक्रवारी (दि. २७) दुपारी तीनच्या सुमारास कारवाई केली. गुंडा विरोधी पथकाला माहिती मिळाली की, चाकण येथील एका हॉटेल समोर एकजण संशयितपणे थांबला आहे, त्याच्याकडे पिस्तूल आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून प्रमोद उर्फ गोट्या अनिल शिंदे (वय ३१, रा. रानमळा, कडूस, ता. खेड) याला ताब्यात घेतले. त्याच्या चारचाकी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये पोलिसांना एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी चारचाकी वाहन, एक पिस्तूल आणि दोन काडतुसे असा दहा लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत प्रमोद याला अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.