माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. मी मंजुर केलेली कामेच सध्या मतदारसंघात सुरु आहेत व या कामांचे श्रेय घेण्याचे काम सध्या विद्यमान खासदार करत आहेत, लोकसभेच्या निवडणुकांना आता तीन वर्षे झाली आहेत. मात्र कोणतेही ठोस काम करता आले नाही अशी टीका माजी खासदार आढळराव पाटील यांनी केली आहे.
पुणे नाशिक महामार्गावरील सर्व पाच बाह्यवळण मार्गांसाठी मी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी केली होती. गडकरी यांनी तातडीने या कामांना निधी देत लोकसभा निवडणुकीच्या आधी कामे सुरु केली, त्याचे श्रेय विद्यमान खासदार घेत आहेत असा टोला आढळराव यांनी लगावला. जुन्नर तालुक्यातील हिरडा प्रक्रिया कारखान्याबाबतही आढळराव यांनी खा.कोल्हे यांच्यावर टीका केली आहे.
आढळराव पुढे म्हणाले, मी आणि शरद सोनवणे यांनी प्रयत्न करुन दहा कोटींचा निधी हिरडा प्रकल्पासाठी आणला. मात्र याचे श्रेय आम्हाला मिळु नये यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधी आयुक्तांना वेठीस धरत आहेत. माजी आमदार-खासदारांना बैठकांना का बोलवता, अशी विचारणा करतात. हिरडा कारखान्याबाबत गलिच्छ राजकारण केले जात आहे. हा कारखाना सुरुच होऊ नये, सुरु होण्याअगोदरच बंद पडावा यासाठी राजकारण केले जात आहे, असं टीकास्त्र आढळराव यांनी सोडलं.