शाळा शिक्षणासाठी आहेत, धार्मिक गोष्टींसाठी नाही, गणवेशाचा आदर केलाच पाहिजे – हेमा मालिनी

कर्नाटकामध्ये हिजाब परिधान करण्यावरून झालेला वाद (Karnatak Hijab Controversy) सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थींनींच्या हिजाब घालण्यावरून वाद अद्याप सुरूच आहे. राजकीय वर्तुळातून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. यावर आता अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या शाळा या शिक्षणासाठी आहेत तेथे धार्मिक गोष्टींसाठी नाहीत, असे त्यांनी बुधवारी सांगितले. हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की, प्रत्येक शाळेचा गणवेश असतो विद्यार्थ्यांनी त्याचा आदर केला पाहिजे. शाळेच्या बाहेर तुम्हाला हवे ते घालता येते.

याबाबत केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनीही या वादाबद्दल मत मांडले आहे, ड्रेस कोड, शिस्त आणि सन्मान राखण्याच्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या निर्णयाला जातीय धार्मिक रंग देणे हे भारताच्या सर्वसमावेशक संस्कृतीविरुद्धचे षडयंत्र आहे. देशातील सर्व संस्था आणि सुविधांवर अल्पसंख्याक समाजाचा समान हक्क आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी कर्नाटक उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्या एकल खंडपीठाने हे प्रकरण उच्च खंडपीठाकडे पाठवले आहे. आता उच्च खंडपीठात या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

हिजाबच्या या वादात एका मुस्लिम विद्यार्थिनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या बीबी मुस्कान या मुस्लिम विद्यार्थिनीच्या धाडसाचे कौतुक केले. त्याचबरोबर जमियत या संघटनेकडून बीबी मुस्कानला 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.