कोविड 19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना राज्य शासनातर्फे ५० हजार रुपयांची मदत मिळणार

कोविड 19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना महाराष्ट्र राज्य शासनातर्फे ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. कोविड 19 च्या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना किंवा निकट नातेवाईकांना सानुग्रह साहाय्य प्रदान करण्याबाबत 26 नोव्हेंबर रोजी आदेश निर्गमीत करण्यात आला आहे. आरटीपीसीआर, माॅलेक्युलर टेस्ट, रॅट या चाचणींमधून पाॅझिटिव्ह अहवाल आलेल्या ज्या व्यक्तीचे अथवा आंतररुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचे निदान क्लिनिकल उपचार कोविड १९ असे झाले होते, त्याच व्यक्तीचे प्रकरण कोविड १९ मृत्यू प्रकरणासाठी कोविड प्रकरण म्हणून समजण्यात येणार आहे.

अशा व्यक्तींचा मृत्यू चाचण्यांमधून झाल्याचेही निदर्शनास आल्याचे अहवालात नमूद असते. एखाद्या रुग्णाचा मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला असेल अथवा त्या व्यक्तीने कोविड 19 चे निदान झाल्यामुळे आत्महत्या केली असेल तरी या योजनेंतर्गत मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसाला लाभ देण्यात येणार आहे. कोविड 19 च्या प्रकरणात मृत्यू 30 दिवसाच्या नंतर झाला असेल तरी अशा व्यक्तीचा मृत्यू देखील कोविड 19 मुळे झाला आहे असे समजण्यात येणार आहे. तांत्रिक अडचण उद्भवल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधून त्या माध्यमातून प्रस्ताव देता येणार आहे.

यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे –

अर्ज दाखल करताना वारसाने किंवा नातेवाईकाने अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक, बँक तपशील व मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा मृत्यू प्रमाणपत्र व इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचे स्वयंघोषणापत्र द्यायचे आहे. मृत पावलेल्या व्यक्तीचा आधार तपशील उपलब्ध असल्यास व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार प्रकरण संगणकीय प्रणालीद्वारे आपोआप स्वीकृत होणार आहे. सर्व अर्ज स्वीकृत झाल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यातर्फे सानुग्रह अनुदान वितरीत करण्यासाठी संगणकीय प्रणालीवर अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे. सर्व मंजूर प्रकरणाची माहितीही उपलब्ध राहणार आहे. यासाठी शासनाच्या वेबपोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचा आहे. यासाठी वेब पोर्टल तयार करण्याची तयारीही सुरु झाली आहे. यानंतरच अर्जदार या पोर्टलवर माहितीसह प्रस्ताव सादर करू शकणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.