गावगुंड मोदी अखेर आला समोर, नाना पटोलेंनी उल्लेख केलेला मोदी सापडला

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ज्या गावगुंड मोदीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं तो अखेर समोर आला. नागपूरमध्ये ॲड. सतीश उके यांनी या तथाकथित गावगुंड मोदीला शुक्रवारी पत्रकारांसमोर आणलं. उमेश घरडे नावाच्या या व्यक्तीने माध्यमांसमोर नाना पटोलेंनी उल्लेख केलेला मीच तो गावगुंड आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या विरोधात काही गुन्हे दाखल असून आपण घाबरलो होतो त्यामुळे गायब होतो असा दावा उमेश घरडे याने केला आहे. सध्या भंडारा पोलीस उमेश घरडेची चौकशी करत आहेत. उमेश घरडे हा लाखणी तालुक्यातील गोंदी गावचा रहिवासी आहे.

आपण दारू विकत होतो, दारू पितो, पत्नी आपल्याला सोडून गेली, आपण नाना पटोले यांना दारूच्या नशेत शिव्या दिल्या आणि विरोधात प्रचार केला, असं सांगत २०२० पासून आपल्याला मोदी असं टोपण नाव पडल्याचं घरडे याने सांगितलं. उमेश घरडे हा पत्नी आणि मुलांसोबत न राहता एकटाच राहत आहे. मात्र घरडेविरोधात पोलिसांकडे कोणत्याही प्रकारची गुन्ह्याची नोंद नाही असे गावकऱ्यांनी म्हटले आहे. नाना पटोले यांनी मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो असे वक्तव्य केल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. भाजपाने नाना पटोले यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत तक्रारी दाखल केल्या होत्या. या प्रकरणावर नाना पटोले यांनी स्पष्टीकरण देत आपण स्थानिक गावगुंडाच्या संदर्भात बोलत होतो असं सांगितलं होतं. त्यानंतर उमेश घरडे हा मोदी नावाचा गावगुंड समोर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.