स्पर्धा परीक्षा अभ्यासिका उभारणीसाठी निधी मिळावा आ.अतुल बेनके यांची मागणी

नारायणगाव | जुन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी जुन्नर चे आमदार अतुल बेनके यांनी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली. जुन्नर, नारायणगाव, ओतूर, निमगाव सावा याठिकाणी अभ्यासकेंद्रे उभारण्यासाठी निधी देण्यात यावा अशा आशयाचे पत्र आमदार बेनके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहे.

माझ्या जुन्नर तालुक्यातील विद्यार्थीही अधिकारी व्हावेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत दाखल व्हावेत. या साठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा तालुक्यातच उपलब्ध व्हाव्यात असा उद्देश समोर ठेवून हि मागणी केली आहे.
– आ.अतुल बेनके

जुन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे मुंबई, नाशिक, औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरात जावे लागत आहे. जुन्नर तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम व दुष्काळी भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शहरातील राहण्याचा खर्च पेलवत नाही. जुन्नर तालुक्याच्या मध्यवर्ती भागात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका केंद्र सुरू करावी म्हणून विद्यार्थी वर्गाकडून वारंवार मागणी केली जात आहे. स्पर्धा परीक्षा तयारीसाठी जुन्नर तालुक्यात कुठेही अभ्यासिकेची सोय नसल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. हजारो विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेच्या तयारी जुन्नर तालुक्यातून शहरी भागात जात आहेत.

जुन्नर तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेसाठी जुन्नर, नारायणगाव, निमगाव सावा, ओतूर याठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी आमदार अतुल बेनके यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.