इंधन दरकपात हे युवक काँग्रेसच्या आंदोलनाचे यश
सत्यजित तांबेंच्या आक्रमक नेतृत्वाखाली युवक काँग्रेसचे यश
संपूर्ण जगात कोरोनाचे संकट आले. हे संकट भारतातही आल्याने देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक कात्रीत सापडले होते. या काळात अनेक व्यवसाय बंद असल्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावली होती. अशा भयाण परिस्थितीतही केंद्र सरकारकडून सातत्याने पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले जात होते. पेट्रोल, डिझेल, घरगुती स्वयंपाकाचा गॅस, खाद्यतेल अशा अनेक गोष्टींचे दर आजही गगनाला भिडले आहेत. या मुद्यावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत देशभरात केंद्र सरकारविरोधात आंदोलने केली.
सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने देखील आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्रभर आंदोलने केली. मोदी सरकारला जाब विचारताना सत्यजीत तांबेनी पेट्रोल-डिझेल दरवाढीला केंद्र सरकार कसे जबाबदार आहे, हे सुद्धा जनतेला समजावून सांगितले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राज्यभर जोरदार निदर्शने केली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरात भाजपविरोधात जनमत तयार झाले.
सत्यजीत तांबेंनी सातत्याने नवनवीन उपक्रम हाती घेऊन पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलने केल्याने भाजपला बॅकफूटवर जावं लागलं आणि त्यामुळेच पेट्रोल 5 तर डिझेल 10 रुपयांनी कमी झालं आहे. तरीही अजून हे दर सर्वसामान्य जनतेच्या खिशाला परवडण्याजोगे निश्चितच नाहीत. त्यासाठी विरोधी पक्षांना एकजूट होऊन आणखी जोरदार आंदोलने करावी लागणार आहेत.