जन्मवर्षानेच लावला चुना!
ऑनलाइन अथवा डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूकीचे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. ओटीपी च्या मदतीने किंवा अन्य कोणते तरी अमिष दाखवून अनेकांना आतापर्यंत लाखो रुपयांना फसवण्यात आले आहे. बँकांकडून तसेच वारंवार डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा पासवर्ड कोणाला सांगून नका तसेच तो कोठेही लिहून ठेवू नका याबाबत सूचना केल्या जातात. एटीएम कार्डचा पासवर्ड नेहमी अवघड असावा तो सहजपणे ओळखता येऊ नये, हा पासवर्ड कधीच जन्म तारीख आणि जन्मवर्ष असू नये अशा पद्धतीच्या सूचना ही बँकांकडून दिल्या जातात. अशाच सूचनांकडे कानाडोळा केल्याचा मोठा फटका एका महिलेला आणि एका जेष्ठ नागरिकाला बसलाय.
एक २१ वर्षीय तरुणी मीरा रोड येथून बोरिवलीला बेस्ट बसने जात असताना तिची बॅग चोरीला गेली. तरुणीच्या बॅगेत रोख रक्कम, एक फोन, डेबिट कार्ड आणि आधार कार्ड होते. संबंधित तरुणीला एटीएममधून १६ हजार ५०० रुपये काढल्याचा मेसेज आला. या मेसेजनंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली. या संदर्भात पोलिसांनी तपास केला. सहाय्यक निरीक्षक सूर्यकांत पवार आणि शीतलकुमार पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्यांना आरोपी दिसला. पोलिसांनी या प्रकरणी साजिद खान आणि हमीद खान यांना ताब्यात घेतले. या दोघांनी बॅग चोरल्याचे आणि एटीएममधून पैसे काढल्याचे कबूल केले.
अशाच प्रकारे एका ज्येष्ठ नागरिकाने एटीएममधून १ लाख रुपये काढल्याची तक्रार केली होती. या नागरिकाच्या बँकेतून एकूण ५ लाख रुपये काढण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणात चोरट्यांनी ७ लाख रुपयांची रक्कम काढण्यात आली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही व्यक्तींनी एटीएम कार्डचा पासवर्ड हा जन्मवर्ष ठेवला होता.