मृतदेहाची विल्हेवाट लावायला आंबोलीत आला, अन् स्व:ताच दरीत कोसळला
आंबोली घाट नेहमीच गुन्हेगारासाठी आश्रयस्थान बनत चालला असून याचाच प्रत्यय आज, मंगळवारी दिसून आला. आर्थिक देवघेवीच्या वादातून झालेल्या भांडणात एकाचा खून झाला. खूनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघेजण आंबोलीत आले. मृतदेह दरीत टाकताना पाय घसरल्यामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला.
ही घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजता घडली. मात्र मंगळवारी दुपारी अडीच वाजता ११२ नंबरवर नातेवाईकांकडुन माहिती देण्यात आल्यामुळे सर्व प्रकार उघड झाला. मात्र या घातपातामागे नेमके कारण काय, हे मात्र अद्याप पोलिसांच्या तपासात उघड झाले नाही. पोलिसांनी खोल दरीत असलेले दोन्ही मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी ते सावंतवाडी कुटीर रुग्णालयाकडे आणण्यात आले आहेत. तर, याप्रकरणात दोघांसोबत असलेल्या एकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.