पुरंदरे ऐकायला- वाचायला मिळाले हे आमच्या पिढीचे भाग्यचं – फडणवीस

प्रख्यात साहित्यिक, लेखक, नाटककार, पद्मविभूषण,  बाबासाहेब पुरंदरे यांचे आज सकाळी निधन झाले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत. तब्बल तीन पिढ्यांना त्यांच्याकडून शिवचरित्र ऐकायला आणि वाचायला मिळाले, हे आमच्या पिढीचे भाग्यच, अशी भावना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

पुरंदरे यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. या वेळी फडणवीस यांनी पुरंदरेंना श्रद्धांजली अर्पण करत साहित्यातील त्यांचे अफाट योगदान आपल्या शब्दांत मांडले. बालपणापासून त्यांनी शिवचरित्र आणि शिवशौर्य सांगून बलशाली समाज घडविण्यात योगदान दिले. एक अमोघ व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक त्यांच्या जाण्याने हरपला आहे. ‘राजा शिवछत्रपती’ सारखा चरित्रात्मक ग्रंथ, ‘जाणता राजा’ महानाट्य हा त्यांनी आपल्याला दिलेला फार मोठा आणि अमूल्य ठेवा, असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बाबासाहेबांची कधीही इतिहास मोडून-तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सिम प्रेम केले, श्रद्धाही जोपासली. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रत्येक तारीख, प्रसंग मुखोदगत असलेले बाबासाहेब होते. शिवकाळ हाच त्यांचा श्वास आणि प्राण होता. ध्येयाप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व, वेळ-शब्दांचे पक्के, सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी कठोर परिश्रम असे बाबासाहेब पुरंदरे आता पुन्हा होणे नाही, अशी खंत या वेळी फडणवीस यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.