पिंपरी चिंचवडमधील भाजपची सत्ता घालवणार, महापालिकेतील भ्रष्टाचार वरिष्ठांच्या मर्जीने? – एकनाथ खडसे
पिंपरी चिंचवडमधील भाजपची सत्ता घालवणार, महापालिकेतील भ्रष्टाचार वरिष्ठांच्या मर्जीने? – एकनाथ खडसे
पिंपरी | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालय उद्घाटन कार्यक्रमासाठी (3 फेब्रुवारी) पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ यांच्या सांगवी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या कामकाजावर खडसे यांनी गंभीर आरोप करत ताशेरे ओढले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सत्ताधाऱ्यांची 24 तास पाणी पुरवठा करणार हि घोषणा खोटी ठरली आहे. पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिकेत आमची सत्ता आल्यावर सर्व भ्रष्टाचार बाहेर काढणार आणि संबंधित गैरव्यवहार करणाऱ्यांना जेलमध्ये पाठवणार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माझ्या मुळे भाजपची सत्ता आली होती आता मी त्यांची सत्ता घालवणार, असे वक्तव्य जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले.
यावेळी बोलताना खडसे म्हणाले कि, भाजप ओबीसी समाजाचा केवळ मतांसाठी वापर करते आणि हे मला मान्य नव्हते. मी सायकल वरून पक्षाचा प्रचार करून पक्ष वाढवला परंतु तरीही पक्षाने मला डावलले ही माझ्यासाठी अनपेक्षित गोष्ट होती. तसेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा खानदेशचा झाला नसल्याची खंतही खडसे यांनी व्यक्त केली. पुन्हा येणार म्हणणारे आज कुठे आहेत? अशी उपरोधिक टीका त्यांनी भाजपवर केली. चंद्रकांत पाटील सरकार पाडण्याचा मुहूर्त काढत आहेत. पण तो मुहूर्त निघू शकत नाही.