ईडीचे अधिकारी तुरुंगात जाणार ? मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई पोलिसांकडून कारवाई सुरू...

मुंबई | शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सक्तवसुली संचालनालयावर (Enforcement Directory) अनेक गंभीर आरोप केले होते. राऊत यांनी आरोप केलेल्या जितेंद्र नवलानी आणि ईडी यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीत उल्लेख असलेल्या कंपन्यांविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे आता मुंबई पोलीस विरूध्द ईडी असा संघर्ष वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खा. राऊत यांनी नवलानी हा ईडीचा एजंट आहे असा गंभीर आरोप केला होता. अनेक कंपन्यांकडून वसूल करण्यात आलेले पैसे नवलानी यांच्या कंपनीच्या खात्यात जमा होत असल्याचे त्यांनी सांगितले होते. यासंदर्भात त्यांनी तक्रार पोलीसांकडे केली होती. त्यानुसार आता ठाकरे सरकारने या तक्रारीची चौकशी सुरू केली आहे. मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून हि कारवाई करण्यात आली असून संबंधितांना समन्सही बजावण्यात आले आहे.

ज्या कंपन्यांच्या नावे पैसे आले आहेत, ते कुठून आणि कसे आले, याबाबत पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, नवलानी याच्या 7 कंपन्या असून खंडणी वसूल केलेले पैसे हे नवलानीच्या कंपन्यांमध्ये टाकण्यात आले आहे. असा आरोप खा.संजय राऊत यांनी केला आहे. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी ७ कोटी रुपये दिले आहेत, असेही राऊत यांनी सांगितले होते. भोसले यांच्यासह DHFL घोटाळ्यातही नवलानी याचा संबंध आहे. या कंपनीकडून नवलानी याच्या खात्यात 25 कोटी, वाधवानकडून दहा कोटी आणि अविनाश भोसलेंच्या कंपन्याकडून सात कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत, असे राऊत यांनी सांगितले. जितेंद्र नवलानी यांच्या कंपन्यांना कोट्यवधी रुपये कसे दिले जातात, असा सवाल करत नवलानी आणि भाजप  नेते किरीट सोमय्या यांचा काय संबंध आहे हे मी लवकरच सांगणार आहे, असा ईशाराही राऊत यांनी दिली होता. ईडीचे काही अधिकारी तुरुंगात जाणार हे माझे शब्द लिहून ठेवा, असेही राऊत यांनी सांगितले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.