खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला यश बिबट्यांचा जन्मदर कमी करण्यासाठी वनविभागाचा केंद्राकडे प्रस्ताव सादर

नारायणगाव – जुन्नर उपवनविभाग क्षेत्रात बिबट प्रजनन नियंत्रण करण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याच्या वन्यजीव विभागाने ११ नर आणि ३६ मादी बिबट्यांवर गर्भनिरोधक उपाययोजना करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्रीय वनविभागाच्या अतिरिक्त महासंचालकांकडे सादर केला आहे.

जुन्नर उपवनविभाग क्षेत्रातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांकडून सातत्याने होत असलेल्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला. गेल्या काही वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे खासदार डॉ. कोल्हे यांनी संसद अधिवेशनात बिबट्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी बिबट प्रजनन नियंत्रण धोरण लागू करण्याची मागणी केली होती. तसेच केंद्रीय वनमंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. खासदार डॉ. कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून वनमंत्र्यांच्या निर्देशानुसार केंद्रीय वनविभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी या विषयीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना दिले होते.

वनविभागाच्या अतिरिक्त महासंचालकांच्या निर्देशानुसार राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. महीप गुप्ता यांनी बिबटप्रवण क्षेत्रातील गावांचे सर्वेक्षण करून मानव-बिबटे संघर्ष कसा कमी करता येईल याचा अभ्यास केला. त्यानुसार वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक पातळीवर ११ नर आणि ३६ मादी बिबट्यांवर गर्भनिरोधक उपाययोजना करण्याचा प्रस्ताव केंद्रीय वनविभागाच्या अतिरिक्त महासंचालकांकडे मान्यतेसाठी सादर केला आहे. या प्रस्तावात वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने नर आणि मादी बिबट्यांच्या ग्रंथींचा अभ्यास व गर्भनिरोधन यावर भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर बिबट प्रवण क्षेत्रातील बिबट्यांच्या हालचाली, खाद्य या बाबींचाही अभ्यास केला जाणार आहे.

खासदार डॉ. कोल्हे यांनी बिबट्यांच्या हल्ल्यांचा प्रश्न संसदेत उपस्थित केल्यानंतर बिबट प्रजनन नियंत्रण धोरणाबाबतच्या हालचाली गतिमान झाल्या असून अशाप्रकारे देशात प्रथमच बिबट प्रजनन नियंत्रण करण्यात येणार असल्याने त्याचा फायदा देशभरातील बिबट प्रवण क्षेत्रातील गावांना होणार आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, बिबट प्रजनन नियंत्रणाचा प्रस्ताव केंद्राकडे सादर झाला आहे. या प्रस्तावाला तातडीने मान्यता मिळावी यासाठी मी लक्ष घालणार असून माझ्या मतदारसंघातील जिवाभावाच्या लोकांचे प्राण बिबट्यांच्या हल्ल्यांपासून वाचविणे ही माझी प्राथमिकता आहे. त्यादृष्टीने प्रश्न पूर्णपणे मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार आहे, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.