दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरण्यावरून झालेल्या वादानंतर भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आणि दिल्लीचे प्रधान सचिव (महसूल) संजीव खिरवार आणि त्यांच्या पत्नीवर कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी संध्याकाळी खिरवार यांची लडाखमध्ये बदली केली आहे. त्याचप्रमाणे मंत्रालयाने या प्रकरणात त्यांची पत्नी रिंकू दुग्गा हिचीही अरुणाचल प्रदेशात बदली केली आहे.
डॉग वॉकसाठी खिरवार यांच्याकडून खेळाडूंना स्टेडियम रिकामे करण्यास सांगितले जात होते. IAS अधिकारी खिरवार आणि त्यांची पत्नी दुग्गा नियमितपणे संध्याकाळी त्यागराज स्टेडियममध्ये त्यांच्या कुत्र्याला फिरायला घेऊन जायचे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सरावावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी खेळाडू करत होते. खेळाडू म्हणाले की, फिरायला येणारे अधिकारी आणि त्यांच्या कुत्र्याला फिरण्यासाठी 7 वाजेपर्यंत स्टेडियम रिकामे केले जाते.
या संदर्भातील वृत्त गुरुवारी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर वाद निर्माण झाला. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार , खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक निघून गेल्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर खिरवार आपल्या कुत्र्यासोबत फिरायला स्टेडियममध्ये पोहोचत असत.
एका प्रशिक्षकाचा आरोप आहे की, पूर्वी ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत दिव्याखाली सराव करत असत, पण आता अधिकारी आणि त्यांच्या कुत्र्याला फिरण्यासाठी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खेळाडूंना मैदानातून बाहेर काढले जाते.
खिरवार यांनी हे आरोप फेटाळून लावले
या प्रकरणात, खिरवार यांनी म्हटले होते की ते कधीकधी आपल्या कुत्र्याला स्टेडियममध्ये घेऊन जातात, परंतु त्याचा खेळाडूंच्या सरावावर परिणाम होत नाही. त्यावर कोणाचा आक्षेप असेल तर ते तसे करणे थांबवतील.
हे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रात्री १० वाजेपर्यंत सर्व स्टेडियम खेळाडूंसाठी खुले ठेवण्याचे आदेश दिले.
ते म्हणाले, “माझ्या निदर्शनास आले आहे की उष्णतेमुळे सरावासाठी खेळाडूंना अडचणी येत आहेत आणि स्टेडियम संध्याकाळी 6 किंवा 7 वाजेपर्यंत बंद करण्यात येतात. आम्ही सूचना देत आहोत की खेळाच्या सर्व सुविधा रात्री 10 वाजेपर्यंत खुल्या ठेवाव्यात जेणेकरून खेळाडूंनी त्यांचा वापर करता येईल.”
या प्रकरणाने पेट घेतल्यानंतर दिल्लीच्या मुख्य सचिवांच्या अहवालाच्या आधारे कारवाई करत गृह मंत्रालयाने आयएएस अधिकारी खिरवार आणि त्यांची पत्नी दुग्गा यांची बदली केली. मंत्रालयाने संध्याकाळी जारी केलेल्या आदेशात, त्यागराज स्टेडियममधील सुविधांचा गैरवापर केल्यामुळे आयएएस अधिकारी संजीव खिरवार यांची लदाख आणि त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांची अरुणाचल प्रदेशात बदली करण्यात आल्याचे म्हटले आहे.