‘झुंड’ चित्रपटाबद्दल केदार शिंदे यांचं ट्विट, “जात… जात नाही तोवर …”
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल आपलं मत व्यक्त केले आहे. अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही या चित्रपटाबद्दल एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे आणि हि पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. केदार शिंदे यांनी त्याच्या ट्विटर हॅण्डलवर लिहिले आहे की, “जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. म्हणून ‘झुंड’ हा चित्रपट पाहा.” शिंदे यांनी केलेलं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. #झुंडसिनेमाम्हणूनपाहा
— Kedar Shinde (@mekedarshinde) March 5, 2022
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. अमिताभ बच्चन या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांनाही पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे, पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली आहे.