भाजप कार्यकर्त्यांनी अटकेच्या दोन – तीन तास आधीच केले ट्विट, कारवाई हेतुपुरस्सर आणि द्वेषाच्या भावनेतून ?
देशमुखांवरील कारवाई हेतुपुरस्सर आणि द्वेषाच्या भावनेतून ?
भाजप कार्यकर्त्यांनी अटकेच्या दोन – तीन तास आधीच केले ट्विट, कारवाई हेतुपुरस्सर आणि द्वेषाच्या भावनेतून ?
मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. सुमारे १२ तासांहून अधिक काळ चाललेल्या चौकशीनंतर मध्यरात्री ‘ईडी’च्या दक्षिण मुंबईतील क्षेत्रीय कार्यालयात देशमुख यांना अटक करण्यात आली.
देशमुख यांच्या अटकेच्या दोन तास आधीच भाजप समर्थकांकडून ट्विटरवर या अटकेबाबतचे ट्विट करण्यात आल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
ईडी कडून पाच समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख सोमवारी सकाळी ११ ते साडेअकराच्या सुमारास ‘ईडी’च्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. रात्रीउशीरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. रात्री ९ दरम्यान त्यांना चौकशी करून पाठवले जाईल व दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलावले जाईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु त्याचवेळी दिल्लीहून अचानक दोन उच्चाधिकारी ‘ईडी’ कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे चौकशी आणखी लांबणार हे स्पष्ट झाले. रात्री ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास सारे चित्र संदिग्ध असताना ‘सुनैना होले’ नावाच्या ट्विटर हँडलवरून ‘मध्यरात्रीनंतर अनिल देशमुखांच्या दिवाळीचे फटाके ईडी कार्यालयात अनुभवा’ असे ट्वीट आले. या ट्वीटला भाजपच्या काही माध्यम फळीतील नेत्यांनी री-ट्विट देखील केले. ट्विटच्या कॉमेंटमध्ये अनिल देशमुखांच्या अटकेनंतर दिवाळीत खूप फटाके वाजवू, अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यामुळे त्यांना अटक झाली, असेच वृत्त सर्वत्र पसरले. वास्तवात त्यांना मध्यरात्री १ ते दीडच्या सुमारास अटक झाली.
या सर्व धामधुमीत सुनैना होले यांचे ते ट्विट चर्चेत राहिले. होले या भाजपच्या समर्थक आहेत. महाविकास आघाडी सरकारविरुद्ध त्या सातत्याने ट्विटरच्या माध्यमातून टीका-टिप्पणी करीत असतात. परंतु अनिल देशमुख यांना अटक होणार की नाही, याबाबत पत्रकारांनादेखील ठोस माहिती नसताना, होले यांनी मध्यरात्रीनंतर त्यांना अटक होणार, अशा आशयाचे ट्विट दोन तास आधीच कसे केले, यावरून भाजप कार्यकर्ते व समर्थक ‘ईडी’शी संलग्न आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.