60 दिवसांत 300 तास काम करत 70 जलशोषक चर खोदणारा निसर्गरक्षक

जुन्नर येथील एक निवृत्त सैनिक पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. जुन्नर तालुक्यातील खोडद येथील रमेश खरमाळे असे या व्यक्तीचे नाव आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेक जलशोषक समतोल चर खोदण्याचे काम केले आहे.

खरमाळे यांनी गेल्या 60 दिवसांत 300 तासांहून अधिक काळ काम करत तब्बल 70 जलशोषक समतल चर खोदून तयार केले. या खड्डयांची पाणी साठवण क्षमता 8 लाख लिटर इतकी आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने हे खड्डे भरून गेलेत. या कार्यातून वन संवर्धनाचा संदेश रमेश खरमाळे यांनी दिला आहे.

खरमाळे हे भारतीय सैन्य दलातील नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर धामणखेल वन विभाग, जुन्नर येथे वनसंरक्षक पदावर नोकरीस आहेत. वृक्षारोपण, बिया रोपण, स्वच्छता अभियान, किल्ले संवर्धन, बारवांचे संशोधन, पुष्करणी संवर्धन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू असते. सध्या त्यांनी जलमृदसंधारणात जलशोषक चर खोदण्याचे काम सुरू केले आहे. या कामात पत्नी स्वाती खरमाळे यांचीही त्यांना मोलाची साथ लाभतेय.

हे काम करताना वनरक्षक पदाच्या कामात कुठेही अडथळा येणार नाही, याची खबरदारी खरमाळे यांच्याकडून घेतली जाते. वन खात्यातील नोकरी सांभाळून त्यांनी हे काम केले आहे. खरमाळे दाम्पत्यांनी एकूण 300 तास काम करताना 412 मीटर काम पूर्ण केले आहे. या कष्टाच्या कामांमुळे शरीर तंदुरुस्त राहते शारीरिक फायदा होतो असेही खरमाळे सांगतात.

डोंगर उतारावर पडणारे पावसाचे पाणी खाली वाहून जाते. त्या प्रवाहासोबत माती वाहून जाऊ नये व हे वाहणारे पाणी डोंगरात- जमिनीत जिरवण्यासाठी पायऱ्यांसारखे खंदक – चर खोदले जातात, त्याला जलशोषक चर म्हणतात. या चरांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण वाढते. वन्यजीव प्राण्यांसाठी डोंगरावरच पाणी उपलब्ध करण्यासाठी चर उपयुक्त ठरतात. तसेच डोंगरावर चांगली वनराई तयार होते, असे खरमाळे सांगतात. येत्या काळातही खरमाळे हे काम सुरू ठेवणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.